भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि.25 एप्रिल) सलग दुसऱ्यांदा जोरदार घसरण दिसून आली आहे. आज दिवसभरात सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी खाली आले आहेत. आयटी (IT) आणि एफएसजीसी (FMGC) कंपन्यांनी आज बाजारात सर्वाधिक दबाव निर्माण केला. निफ्टीमध्ये आयटी आणि एफएमजीसी इंडेक्समध्ये आज 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दिसून आली.
आयएफआर ग्लोबल (IFR Global) या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका फेडची आक्रमक नीती, चीनमध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लागू करण्यात येणारा लॉकडाऊन तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यात चाललेल्या युद्धामुळे जागतिक बाजाराला सर्वाधिक फटका बसत आहे. निफ्टी आज दिवसअखेर 218 अंकांनी (1.27 टक्के) खाली येऊन 16953.95 अंकावर बंद झाला. तर सेन्सेक्स 617.26 अंकांनी (1.08 टक्के) कोसळून 56579.89 अंकावर बंद झाला.
शेअर बाजार कोसळण्याला कारणाभूत ठरलेल्या काही कारणांवर नजर टाकुया.
1. ग्लोबल मार्केटची चिंताजनक स्थिती
22 एप्रिलला अमेरिकेच्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. डाओ जोन (dow jones) मध्ये 2020 नंतर एका दिवसात एवढ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. चीनच्या हॉंगकॉंग बरोबरच आशियातील इतर बाजारांमध्येही उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले नाही.
2. चीनमध्ये कोविड-19 चा कहर
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता असलेल्या आणि वेगाने वाढणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. चीनच्या झिरो कोविड–19 च्या पॉलिसीमुळे अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. यामुळे उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीवर निगेटीव्ह परिणाम दिसू लागला आहे. चीनमधील या अशा वातावरणामुळे ग्लोबल मार्केट आणि उत्पादनासाठी चीनवर अवलंबून असलेल्या देशांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
3. वाढती महागाई
इंडिनेशियाने पाम ऑईलच्या निर्यातीवर बंदी घातल्याने त्याचा परिणाम बाजारावर होऊन महागाईचा आलेख वाढू लागला आहे. आपल्या बऱ्याचशा दैनंदिन गोष्टींमध्ये पाम ऑईलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यामध्ये शॅम्पूपासून अनेक उत्पादनांचा समावेश आहे. इंडिनेशियाकडून पाम ऑईलच्या निर्याती बंदी लवकर उठवली गेली नाही तर स्थिती अजून खराब होऊन महागाई वाढू शकते. वाढत्या महागाईवर आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) व्याज दरांमध्ये वाढ करू शकते.
4. अमेरिकेत व्याजदर वाढीची होऊ शकते घोषणा
अमेरिका फेडचे प्रमुख जेरोम पॉवेलने (Jerome Powell) नुकतेच म्हटले होते की, मे महिन्यामध्ये होणाऱ्या फेड च्या मिटिंगमध्ये व्याज दरामध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली जाऊ शकते. त्यानंतर जून महिन्यातही व्याज दरात वाढ केली जाऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चततेचे वातावरण आहे.
5. रशिया – युक्रेन युद्ध
रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाला आता 2 महिने होत आले आहेत. या युद्धामुळे इक्विटी मार्केटमध्ये अनिश्चितता पसरली असून मोठ्या प्रमाणात अस्थिरता (Volatility) आहे. यामुळे महागाईने रौद्र रूप धारण केले आहे. रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या वरच स्थिरावत आहेत. याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत आहे.
6. एफपीआय (FPI)ची सलग विक्री
फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टमेंटकडून (FPI) भारतीय बाजारात सुरू असलेल्या सततची विक्री ही भारतीय बाजाराच्या घसरणीचे एक प्रमुख कारण मानलं जात आहे. ऑक्टोबरपासून फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टमेंटने आतापर्यंत 2 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे भारतीय बाजारपेठेतून काढून घेतले आहेत.
वर दिलेल्या या काही प्रमुख कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. रशिया-युक्रेन युद्धाबरोबरच, चीनमध्ये कोविड रूग्णांची संख्या आणखी वाढली तसेच इंडोनेशिया देशाने निर्यात बंदी नाही उठवली तर भारतीय बाजारात आणखी घसरण होण्याची शक्याता वर्तवली जात आहे.