NEOM Smart City: सौदी अरेबिया सरकारने जो प्रोजेक्ट हाती घेतला आहे; तो संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारा ठरणार आहे. आतापर्यंत आपण जगातील 7 आश्चर्यांचा सातत्याने उल्लेख करत आलो आहोत. पण हा प्रोजेक्ट म्हणजे त्याच्या पुढचा टप्पा असणार असून, तो टेक्नॉलॉजीच्या दृष्टीकोनातून एक नवीन पर्व निर्माण करणारा आहे. या प्रोजेक्टला सौदी सरकारने निऑम (NEOM) असे नाव दिले आहे.
निऑम प्रोजेक्ट म्हणजे उभ्या वाळवंटात 170 किलोमीटर लांबीची, 200 मीटर रुंदीची आणि जवळपास 500 मीटर उंचीची गगनचुंबी इमारत (Desert Skyscraper) उभारली जाणार आहे. 500 मीटर उंच म्हणजे आताच्या आयफेल टॉवरपेक्षा उंच असणार आहे. या फ्युच्युरिस्टिक शहरासाठी (Futuristic City) 1 ट्रिलिअन अमेरिकन डॉलर खर्च केला जाणार आहे. ही लांबलचक गगनचुंबी इमारत एका आयताकृती आरशाप्रमाणे असणार आहे. म्हणजे या इमारतीला बाहेरून पूर्णपणे ग्लास लावले जाणार आहे. ही आरशासारखी रेषा सौदीतील लाल समुद्राच्या किनारपट्टीपर्यंत ओढली जाणार आहे आणि 75 मैलांच्या लांबलचक रेषेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificail Intelligence) आविष्कार पाहायला मिळणार आहे.
सौदी अरेबियाचे राजकुमार प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य-दिव्य असा प्रोजेक्ट उभा राहत आहे. हा प्रोजेक्ट जगातील 7 आश्चर्यांना मागे टाकणारा असेल, असा सौदीच्या प्रिन्सचा मानस आहे. या प्रोजेक्टचे काम सुरू झाले असून ते 2045 पर्यंत पूर्ण होईल, असा सौदी सरकार आणि त्यावर काम करणाऱ्या इंजिनिअर्सना वाटते.
सौदी अरेबिया सरकारने हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. पण या प्रोजेक्टमुळे सौदी अरेबियाला फायद काय होणार आहे. यातून भविष्यात सौदीला काही उत्पन्न अपेक्षित आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण सौदी अरेबिया हा संपूर्ण जगाला कच्चे तेल पुरविणारा सर्वांत मोठा पुरवठादार आहे. कच्च्या तेलाच्या बळावर या देशाने भरपूर पैसा कमवला आहे. पण त्या व्यतिरिक्त या देशाकडे आर्थिक उत्पन्नाचा दुसरा कोणताच ठोस स्त्रोत उपलब्ध नसल्याचे दिसून येते. तर मित्रांनो, हेच यामागचे ठोस आणि महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. सौदीची अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून आहे आणि आता संपूर्ण जग आपली तेलावरील भिस्त कमी करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तेलाच्या खाणी असलेल्या देशांना आता उत्पन्नासाठी नवीन स्त्रोतांची जुळवणी करावी लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौदी अरेबियाने महत्त्वाचे पाऊल उचलत Saudi Vision 2030 प्लॅन आणला आहे.
Saudi Vision 2030
सौदी अरेबियाने आपली तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था कमी करण्यासाठी नवीन पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौदी अरेबियाने 'Saudi Vision 2030' आणले आहे. यामध्ये सौदीने हेल्थ, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, टुरिझम आणि सर्वांत महत्त्वाचे नॉन-ऑईल एक्सपोर्टवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. या सौदी व्हिजन 2030 प्रोजेक्टचा भाग आहे; NEOM Smart City. या फ्युच्युरिस्टिक सिटीच्या प्रोजेक्टसाठी सौदी अरेबियाने 26,500 किलोमीटरची जागा संरक्षित केली आहे. या प्रोजेक्टद्वारे सौदी अरेबिया टुरिझम आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.