Subway vs Suberb: आपल्या बिझनेसचे नाव, लोगो कोणी कॉपी करू नये यासाठी आपण त्याचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केले जाते, व्यवसायाबाबत इतर शासकीय नोंदण्या केल्या जातात. तरी, एखाद्या लोकप्रिय ब्रँडच्या नावात हलकासा बदल करून, ते नाव स्थानिक पातळीवर वापरले तर कोणाल काय समजणार असे वाटते आणि अनेकजण ब्रँडचे ट्विस्ट करून, त्यांच्या लोगोसारखा लोगो बनवून, सारखेच पॅकेजिंग करून व्यवसाय करतात, अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. बिसलेरी, कॅडबरी, मॅगी आदी ब्रँडनेम ट्विस्ट करून, त्यांच्यासारखे पॅकेजिंग आणि लोगो वापरुन स्थानिक पातळीवर व्यवसाय करतात, मात्र आताच्या ऑनलाईनच्या जगात असे इतक्या सहज करणे शक्य होत नाही. तरिही असे प्रकार जगभरात घडत असतात. मात्र त्या - त्या कंपन्यांचे लीगल विभाग या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे अशी प्रकरणे कोर्टात जातात किंवा आऊट ऑफ द कोर्ट सेटल होतात. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात निकाल दिला आहे.
सबवे विरुद्ध सबर्ब प्रकरण काय आहे? (What is the subway vs. Suberb case?)
भारतातील सबमरीन सँडवीचमधील लोकप्रिय ब्रँड, सबवे (subway)! तर, दिल्लीतील सँडवीच विक्रेते क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट सबर्ब (Suberb) यांच्या ट्रेडमार्क (Trademark) लोगोमध्ये (Logo), नावामध्ये साधर्म्य आहे. यावरुन, सबवेने सबर्बवर याचिका दाखल केली. सबवेने आपल्या याचिकेत म्हटले होते की, सबर्बमध्ये सब हा शब्द वापरू शकत नाहीत, या शब्दावर सबवेचा अधिकार आहे. तसेच सबवेच्या लोगोमधील रंगसंगतीही सबर्बने कॉपी केली आहे. यासह, सबवेमध्ये विक्री केले जाणारे प्रसिद्ध व्हेजी डिलाइट आणि सबवे क्लब हे विकण्याचा केवळ सबवेचा अधिकार आहे, आम्ही दिलेल्या नावांनी इतर कोणीही असे सँडवीच विकू शकत नाही. ट्रेकमार्कशी संबंधित असलेल्या कायद्यांच्या उल्लंघनाविषयीचा हा खटला होता.
या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. या प्रकरणाचा नुकताच निकाल न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांनी दिला आहे. या 26 पानी निकालपत्रात, सबवेने दाखल केलेले सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. सबवेचा लोगो पांढऱ्या आणि पिवळ्या रंगात आहे, तर सबर्बचा लोगो हिरव्या आणि पिवळ्या रंगात आहे. दुसरीकडे, सबवेच्या लोगोचा फाँट आणि सबर्बच्या लोगोचा फाँट पूर्णपणे वेगळा आहे. तसेच, सँडविचेसच्या प्रकारांबाबत किंवा विकत असलेल्या मेन्यू मधील नावांमधील साधर्म्य आता उरलेलेच नाही आहे, कारण डिसेंबर 2022 मध्ये सबर्बने व्हेजी डिलिशियस, सब ऑन क्लब, व्हेज लोडेर रेग्युलर आणि टोर्टा क्लब अशी नावे दिली आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा राहिला तो 'सब' या शब्दाचा, तर वाचकहो, सब हा एक कॉमन, सर्वसाधारण आणि सार्वजनिक शब्द आहे. सबमरीन सँडविचचा लघु संक्षिप्त किंवा शॉर्ट फॉर्म म्हणून सब हा शब्द वापरला जातो. अनेक रेस्टॉरंट, सँडविच विक्रेते सब या सब्दाचा वापर करतात. यावर सबवेची मालकी असू शकत नाही. सबच्या वे आणि र्ब ही अक्षरे एकमेकांशी साधर्म्या साधत नाही, त्यामळे सबवेने केलेली याचिका आणि आरोप फेटाळण्यात आले.
सबमरीनचे सब कधी झाले? (When did the word 'submarine' become 'sub'?)
खरेतर, सबवे ऑगस्ट 1965 साली आण्विक शास्त्रज्ञ पीट बक आणि फेड्रीक डेलुका यांनी अमेरिकेतील मिलफोर्ड येथे सुरू केले होते, त्यावेळी त्याचे नाव पीट'स सुपर सबमरीन्स होते. 1966 साली त्यांनी या क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटचे (QSR: Quick Service Restaurant) नाव बदलून, सबवे हे नाव इट फ्रेश या स्लोगनसह ठेवले. सब सँडवीच म्हणजेच, सबमरीन सँडवीच जे मूळ इटालियन आहे. इटालीय ब्रेड रोलमध्ये विविध भाज्या, मटण-चिकन किंवा बीफ, व्हेजमध्ये कबाब, कटलेटसह विविध सॉस म्हणजे पातळ चटण्या घालून एकप्रकारचे मील बनवले जाते.हा पदार्थ इटालीय-अमेरिकी कम्युनिटीचा असल्याचे मानले जाते. मुळात, ब्रेडच्या आकारामुळे याला सबमरीन अर्थात पाणबुडी म्हटले जाते. याचाच अर्थ काय, सबवेनेही सबमरीन सँडवीचचे सब असे शॉर्ट फॉर्म केले. दुसरे म्हणजे, सबमरिन हा शब्द सार्वजनिक आहेच आणि अशाप्रकारचे सँडवीच विक्रेते याचे सब-सँडवीच म्हणून सर्रास नामकरण करतात, यात कुठेही मालकीचा प्रश्न येत नाही.
सबवेने 2021 आणि 2022 मध्ये काही फूड रेस्टॉरंटवर लोगोमध्ये पिवळा रंग किंवा हिरवा रंग वापरल्यावरुन याचिका दाखल केल्या होत्या, मात्र त्याही फेटाळल्या गेल्या. खरेतर, प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या कंपनीचा लोगो, स्लोगन, इतर उपनावे ट्रेडमार्क करून नोंदणीकृत केली पाहिजेत, जेणेकरून ती इतर कोणीही वापरू शकणार नाही, तुमच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेऊ शकणार नाहीत. शाहरुख खानने त्याचे एसआरके हे नाव ट्रेडमार्क करून घेतले आहे. जेणेकरून एसआरकेचे कोणीही कुठेही वापरुन शाहरुखच्या नावाचा फायदा किंवा त्याची बदनामी करू नये यासाठी केले आहे. मात्र, कोणावरही याचिका दाखल करण्यापूर्वी सर्वतोपरी विचार करावा अन्यथा आपलीच नाचक्की होते, असे व्यवसाय सल्लागार संजय सावला यांनी सांगितले.