आपल्या पश्चात कुटुबियांची आर्थिक चिंता दूर करणारे खात्रीशीर विमा उत्पादन म्हणजे टर्म इन्शुरन्स. मागील काही वर्षात टर्म इन्शुरन्सला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी ग्राहकांनी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्समधील अटी आणि शर्थींचा विचार करुनच तो घेतला पाहिजे.
तुमचे राहणीमान, तुमचे उत्पन्न, कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून असलेले सदस्य या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण या लेखातून समजून घेऊया.
Table of contents [Show]
- 1) टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समध्ये फरक आहे का?
- 2) टर्म इन्शुरन्समध्ये ठराविक वर्षांनंतर प्रीमियम बदलतो का?
- 3) व्यवसनांचा टर्म इन्शुरन्स घेताना किती परिणाम होतो?
- 4) टर्म इन्शुरन्स आणि अॅक्सिडेंटल इन्शुरन्स यांत फरक काय?
- 5) टर्म इन्शुरन्सची मुदत पूर्ण झाल्यास लाभ मिळतो का?
- 6) टर्म इन्शुरन्समध्ये एकापेक्षा अधिक दावे करता येतात का?
- 7) NRI भारतात टर्म इन्शुरन्स खरेदी करु शकतात का?
- 8) टर्म इन्शुरन्स कर सवलतीसाठी पात्र आहे का?
1) टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समध्ये फरक आहे का?
- होय, लाईफ इन्शुरन्स अर्थात आयुर्विम्यात मुदतपूर्तीवेळी विमाधारकाला जमा रक्कम आणि त्यावर बोनस असा लाभ मिळतो. मात्र त्याउलट टर्म इन्शुरन्समध्ये मुदतपूर्ती झाल्यास कोणताही लाभ मिळत नाही. पॉलिसी टर्ममध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना विमा भरपाई दिली जाते.
2) टर्म इन्शुरन्समध्ये ठराविक वर्षांनंतर प्रीमियम बदलतो का?
- टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. यात टर्म इन्शुरन्स घेताना ग्राहकाच्या विविध सवयींची नोंद घेतली जाते. जसे की धूम्रपान, मद्यपान अशा सवयी सोडणे किंवा त्यांचे सेवन कमी करणे तसेच जोखीमयुक्त इंडस्ट्रीजमधील नोकरी अशा घटकांमध्ये पॉलिसी टर्ममध्ये बदल झाल्यास त्याच्या प्रीमियम रकमेत फरक पडू शकतो. हे सर्व विमा कंपनीवर अवलंबून असते.
3) व्यवसनांचा टर्म इन्शुरन्स घेताना किती परिणाम होतो?
- जो व्यक्ती कोणत्याही प्रकारचे व्यसन करत असेल तर तो विमा कंपनीच्या दृष्टीने अति जोखमीचा समजला जातो. त्यामुळे व्यसन असलेल्या ग्राहकाला विमा पॉलिसी इश्यू करताना विमा एजंट किंवा कंपनीचे कर्मचारी कठोर वैद्यकीय तपासणी किंवा त्याची कागदोपत्री हमी लिहून घेतात. खासकरुन धूम्रपान करणाऱ्या ग्राहकाला जादा प्रीमियम आकारुन टर्न इन्शुरन्स इश्यू केला जातो.
4) टर्म इन्शुरन्स आणि अॅक्सिडेंटल इन्शुरन्स यांत फरक काय?
- अॅक्सिडेंटल इन्शुरन्स अर्थात अपघात विमा प्लानमध्ये अपघातात मृत्यू झाल्यास त्यावर विमा भरपाई दिली जाते. टर्म इन्शुरन्समध्ये मात्र नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या वारसांना भरपाई मिळते.
5) टर्म इन्शुरन्सची मुदत पूर्ण झाल्यास लाभ मिळतो का?
- टर्म इन्शुरन्सची मुदतपूर्ती झाल्यानंतर ग्राहकाला कोणताही लाभ मिळत नाही. टर्म इन्शुरन्स हा पूर्णपणे विमा सुरक्षा देणारे उत्पादन आहे, मात्र टर्म इन्शुरन्सला आकर्षक करण्यासाठी काही कंपन्यांनी रिटर्न ऑफ प्रीमियमच्या स्वरुपात लाभ देण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा टर्म इन्शुरन्सची मुदतपूर्ती होते तेव्हा ग्राहकाला काही प्रीमियमची रक्कम परत मिळते.
6) टर्म इन्शुरन्समध्ये एकापेक्षा अधिक दावे करता येतात का?
- वेगवेगळ्या कंपन्यांचे टर्म इन्शुरन्स असल्यास कंपन्यांकडून एकापेक्षा अधिक दावे स्वीकारले जातात. मात्र जेव्हा पॉलिसी खरेदी केली जाते तेव्हा ग्राहकाला सर्व पॉलिसींची माहिती सादर करावी लागते.
7) NRI भारतात टर्म इन्शुरन्स खरेदी करु शकतात का?
- भारत आणि इतर देशांचे नागरिकत्व असलेल्या अर्थात दुहेरी नागरिकत्व असलेल्या भारतीयांना भारतात टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यास परवानगी आहे.
8) टर्म इन्शुरन्स कर सवलतीसाठी पात्र आहे का?
- आयकर कलम 80 सी नुसार टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम कर सवलतीसाठी पात्र आहे. एका आर्थिक वर्षात आयकर सेक्शन 80 सीनुसार 1.5 लाख रुपयांची कर सवलत मिळते.