माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला जून ते सप्टेंबर या तिमाहीत 11342 कोटींचा नफा झाला. यंदाच्या तिमाहीत नफ्यात 9% वाढ झाली. कंपनीने प्रती शेअर 9 रुपयांचा लाभांश जाहीर केला असून 17000 कोटींचे शेअर पुनर्खरेदीची घोषणा कंपनीने केली.
आज बुधवारी 11 ऑक्टोबर 2023 रोजी टीसीएसने दुसऱ्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर केली. यात कंपनीच्या नफ्यात 9% वाढ झाली आहे. कंपनीला 59692 कोटींचा एकूण महसूल मिळाला आहे. यात 7.9% वाढ झाली. ऑपरेटिंग मार्जिन 24.3% इतके वाढला आहे.
कंपनीने 9 रुपये प्रती शेअर डिव्हीडंड जाहीर केला आहे. यासाठी 19 ऑक्टोबर 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. 7 नोव्हेंबर 2023 रोजी लांभांश समभागधारकांना अदा करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीकडे 30 सप्टेंबर 2023 अखेर 608985 इतके मनुष्यबळ आहे.
टीसीएस ही कर्जमुक्त कंपनी आहे. 30 जून 2023 अखेर कंपनीकडे 15622 कोटींची रोख शिल्लक आहे. कंपनीला पहिल्या तिमाहीत महसुलात 13% वाढ झाली. कंपनीला 59381 कोटींचा महसूल मिळाला. कंपनीला 11074 कोटींचा नफा मिळाला होता.
शेअर बायबॅकची घोषणा
टीसीएसने आज शेअर बायबॅकची घोषणा केली. कंपनी शेअर बाजारातून 17000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार आहे. यासाठी प्रती शेअर 4150 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. सध्या बाजार भावाच्या तुलनेत हा दर 15% ने अधिक आहे. आज टीसीएसचा शेअर 3613 रुपयांवर स्थिरावला. मागील सहा वर्षात टीसीएसकडून पाचव्यांदा शेअरची पुनर्खरेदी करण्यात येणार आहे. यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये टीसीएसने 18000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी केली होती. त्यावेळी गुंतवणूकदारांना प्रती शेअर 17% प्रीमियम मिळाला होता.