टाटा समूहातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) शेअर पुनर्खरेदी करण्याची शक्यता आहे. टीसीएसच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअर बायबॅक योजनेचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. मात्र किती हजार कोटींची शेअर पुनर्खरेदी होणार याबाबत कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
टीसीएस संचालकांची बैठक येत्या 11 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी दुसऱ्या तिमाहीचा निकाल आणि शेअर बायबॅक योजनेबाबत निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. 2017 पासून टीसीएसने चार वेळा शेअर बायबॅक केले आहेत.
टीएसीएसने 2022 मध्ये 18000 कोटींचे शेअर बायबॅक केले होते. कंपनीने खुल्या बाजारातून 4 कोटी शेअरची पुनर्खरेदी केली होती. त्याआधी 16000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी केली होती. 2017 पासून कंपनीने एकूण चार वेळा शेअर पुनर्खरेदी केली आहे. यातून 66000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करण्यात आले.
मागील वर्षभरापासून जागतिक पातळीवर आयटी क्षेत्रासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू आर्थिक वर्षात यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे महसुलावर दबाव कायम राहील. त्यामुळे जवळपास सर्वच आयटी कंपन्यांवर दबाव आहे.
टीसीएस ही कर्जमुक्त कंपनी आहे. 30 जून 2023 अखेर कंपनीकडे 15622 कोटींची रोख शिल्लक आहे. कंपनीला पहिल्या तिमाहीत महसुलात 13% वाढ झाली. कंपनीला 59381 कोटींचा महसूल मिळाला. कंपनीला 11074 कोटींचा नफा मिळाला होता.
चालू वर्षात टीसीएसपूर्वी इन्फोसिस आणि विप्रो या दोन कंपन्यांनी शेअर पुनर्खरेदी केली होती. यात फेब्रुवारी 2023 मध्ये इन्फोसिसने 9300 कोटींचे शेअर पुनर्खरेदी केली होती. जून 2023 मध्ये विप्रोने 12000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी केली होते.