देशातील आघाडीच्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपमधील नवीन कंपनी भांडवली बाजारात प्रवेश करणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेड या कंपनीच्या आयपीओची घोषणा करण्यात आली आहे. तत्पूर्वी टाटा टेक्नॉलॉजीसच्या शेअरची ग्रे मार्केटमध्ये मागणी वाढली आहे. टाटा टेक्नॉलॉजीसचा शेअर वधारला आहे. टाटा टेक्नॉलॉजीसचा शेअर 105 रुपये प्रीमियमसह ग्रे मार्केटमध्ये ट्रेड करत आहे.
विश्वासार्हता, मेहनत आणि नाविन्यतेसाठी टाटा समूह ओळखला जातो. तब्बल 19 वर्षांनी या समूहातील एक कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. टाटा टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या आयपीओबाबत तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.
शेअर बाजार रेग्युलेटर सेबीने टाटा टेक्नॉलॉजीसच्या आयपीओला परवानगी दिली आहे. कंपनी ऑफर फॉर सेलमधून टाटा टेक्नॉलॉजीसच्या शेअर्सची खुल्या बाजारात विक्री करेल. याच ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबरमध्ये टाटा टेक्नॉलॉजीसचा आयपीओ प्राथमिक बाजारात धडकण्याची शक्यता आहे.
त्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीसच्या शेअर्सची मागणी वाढली आहे. मागील आठवडाभरात टाटा टेक्नॉलॉजीसच्या शेअर प्रीमियमध्ये 16% वाढ झाली. गेल्या आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीसचा ग्रे मार्केटमधील प्रीमियम 89 रुपये इतका होता. तो आता 105 रुपयांपर्यंत वाढला आहे.
गेल्या आठवडाभरात शेअर मार्केटमध्ये घसरण झाली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरले होते. मात्र तरिही टाटा टेक्नॉलॉजीसच्या शेअर्सला ग्रे मार्केटमध्ये चांगली मागणी असल्याचे दिसून आले आहे. यावरुन गुंतवणूकादारांच्या टाटा टेक्नॉलॉजीसच्या आयपीओमधून अपेक्षा वाढल्या आहेत.
शेअर बाजार विश्लेषकांच्या मते टाटा टेक्नॉलॉजीस 12000 कोटींचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे. कंपनीकडून 405668530 शेअर्स आयपीओमध्ये विक्री करण्यात येणार आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीसच्या शेअरची किंमत
टाटा टेक्नॉलॉजीसकडून प्रति शेअर 295 रुपये दर ठरवला जाऊ शकतो. काहींच्या मते टाटा टेक्नॉलॉजीसकडून आयपीओसाठी प्रति शेअर 265 ते 270 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला जाऊ शकतो. तर काहींच्या मते टाटा टेक्नॉलॉजीसचा शेअरचा भाव 315 ते 320 रुपये या दरम्यान असण्याची शक्यता आहे. कंपनीकडून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 10 ते 15% सवलत दिली जाण्याची शक्यता आहे.