पवन उर्जा निर्मिती क्षेत्रातील सुझलॉन एनर्जी (Suzlon energy) या कंपनीची कर्ज मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुझलॉन कंपनीने क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP)च्या माध्यमातून 2,000 कोटीचे भांडवल जमा केले आहे. त्यातून कंपनी आता 1500 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. तर उर्वरित रक्कम कंपनीच्या विकासासाठी वापरणार आहे.
कंपनीला 1800 कोटींचे कर्ज
सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon energy )या आर्थिक वर्षातीच्या अहवालानुसार कंपनीवर जूनच्या तिमाहीपर्यंत एकूण 1800 कोटी रुपयाचे कर्ज आहे. या संदर्भात कंपनीचे वित्त विभाग प्रमुख हिमांशू मोदी यांनी माहिती दिली आहे. कंपनीने QIP साठी प्रति शेअर 18.44 ची फ्लोअर किंमत निश्चित केली होती. तसेच सेबीच्या नियमानुसार कंपनीने आपल्या शेअरसच्या 19.56 या किमतीवर गुंतवणूकदारांना 5.7% सूट दिली आहे. सेबीच्या नियमांनुसार कंपनी गुंतवणूकदारांना फ्लोअर प्राइसवर 5% पर्यंत सूट देऊ शकते. यामाध्यमातून कंपनीने 2000 भांडवल उभे केले आहे. या संदर्भात सीएनबीसी या माध्यमाने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
15 वर्षापासून तोट्यात
सुझलॉन कंपनीचा आयपीओ 2005 मध्ये आला होता. त्यानंतर अपारपंरिक क्षेत्रातील भविष्य पाहून कंपनीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी गुतवणूक केली. 2008 मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसला आणि तेथून कंपनी तोट्यात जाऊ लागली. 2008 मध्ये कंपनीच्या शेअर्सची किमत 400 रुपये होती. ती आज घडीला 19 रुपयांवर येऊन पोहोचली आहे. मध्यतरीच्या काळात कंपनीला कोरोना महामारीचा देखील फटका सहन करावा लागला होता. दरम्यान, कंपनी कर्जमुक्त झाल्यास येणाऱ्या काळात सुझलॉनच्या शेअर्सच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते, असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.