ऑनलाइन डिजिटल लॉकर म्हणजे काय हे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. तुमची महत्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात संरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकरचा उपयोग केला जातो. भारत सरकारने काही वर्षांपूर्वी https://www.digilocker.gov.in/ हे पोर्टल सुरु केले आहे, जिथे नागरिकांना डिजिटल लॉकर उपलब्ध करून दिले जाते.
आता मात्र भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन डिजिटल लॉकरची सुविधा देऊ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अशी सुविधा सुरु करणारी पहिली बँक ठरली आहे. डिजिटल लॉकरचा प्रचार आणि वापर ग्रामीण भारतात अजूनही म्हणावा तितका झालेला नाहीये. शहरी भागात याचा वापर नागरिक करत असले तरी तुलनेने ग्रामीण भागातील नागरिकांना यासाठी प्रशिक्षित करणे जिकरीचे काम बनले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने हे काम सोपे होईल असे जाणकारांचे मत आहे.
Unlock the power of Digi Locker with Online SBI.#SBI #AmritMahotsav #Digilocker #Documentstorage #Paperless #Onlinedocumentstorage pic.twitter.com/OlUO2UuG2j
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 15, 2023
डिजीलॉकरला डिजिटल लॉकर असेही म्हणतात. तुमचे महत्वाचे दस्तऐवज डिजिटल वॉलेटमध्ये ठेऊन तुम्ही ते सुरक्षित करू शकता. जेव्हा तुम्ही हे लॉकर सुरु कराल तेव्हाच तुम्हाला वेगवेगळी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. हे लॉकर ग्राहकांच्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. याचाच अर्थ ग्राहकांचे केवायसी अपडेट बँकेत वेळोवेळी होणे गरजेचे आहे.
या लॉकरमध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, वोटर आयडी, विमा पॉलिसी, घराची कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे यांसारखी अनेक दस्तऐवज ठेवू शकता. यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. लॉकरसाठी साइन अप करतानाच तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अशा प्रकारे तुम्ही तुमची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला एक डेडीकेटेड क्लाउड स्टोरेज स्पेस मिळेल.
एसबीआयने डिजीलॉकर संदर्भात माहिती देताना म्हटले आहे की ग्राहक या डिजीलॉकरमध्ये त्यांचे खाते विवरण, फॉर्म 15A आणि गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्र देखील ठेवू शकतात. खातेदार ग्राहक त्यांच्या मोबाईलमधून डिजीलॉकर वापरू शकणार आहेत. सामान्य ग्राहकांकडून बँकेतील व्यवहारासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करून घेणे, त्याची निगा राखणे हे बँकेसाठी देखील जिकीरीचे काम बनले होते. डिजिटल कागदपत्रांमुळे त्याचा सांभाळ करण्याचा ताण कमी होणार आहे.
भारत सरकारने सुरु केलेल्या डिजिटल लॉकरमध्येच बँक खातेदारांची कागदपत्रे ठेवली जाणार आहे. बँकेने स्वतःचे असे काही स्वतंत्र पोर्टल बनवलेले नाही. केवळ ग्राहकांची सोय व्हावी म्हणून त्यांना बँकेसंदर्भातील विविध कागदपत्रे डिजिटल लॉकरमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत.