शहरी भागात बँकिंग आणि वित्तीय सेवांचे जाळे उभे राहिले आहे. मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागात वित्तीय सेवा अजूनही पूर्णत: पोहचल्या नाहीत. शहरांपासून लांब डोंगराळ भागातील दुर्गम गावे, मागासलेला पट्टा आणि आदिवासी भागात पायाभूत सुविधांची वानवा असल्याने नागरिकांचे हाल होतात. अशा दुर्गम भागात बँक मित्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर/पॉइंट उभारण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांना सेवा पुरवताना या सेंटर्सला सुद्धा मर्यादा आहेत. सार्वजनिक आणि खासगी बँकांनी खेडोपाडी अशा सेवा केंद्रांचे जाळे उभारले आहे. या सेवा केंद्रांवर आय स्कॅनर (डोळे स्कॅनर) सुविधा उभारण्याचा विचार स्टेट बँक ऑफ इंडिया करत आहे.
ओडिशातील प्रकरणानंतर स्टेट बँकेचा निर्णय
ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यात एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बँकिंग सुविधाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सुर्या हरिजन नामक महिला तुटक्या खुर्चीच्या सहाय्याने पायी प्रवास करुन बँकेत पेन्शन काढण्याकरिता आल्याचा व्हिडिओ माध्यमांतून समोर आला होता. या महिलेला गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये पेन्शन मिळत असे. मात्र, वृद्धापकाळाने आणि हाताच्या बोटांना इजा झाल्यामुळे खातेदाराची ओळख पटण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे खेडेगावातून शहरातील बँक शाखेत पेन्शन काढण्याकरिता या महिलेला जावे लागले.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. गावामध्ये बँकिग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काय व्यवस्था आहे, असा प्रश्न त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला विचारला. दरम्यान, गावामध्ये बँक मित्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स असतात तेथे आय स्कॅनरची सुविधा नसते. या घटनेपासून धडा घेत आता स्टेट बँकेने CSC सेंटर्स, बँक मित्र आणि बँकिंग करसपाँडन्स नेटवर्क येथेही आय स्कॅनर सुविधा ठेवण्यावर विचार सुरू केला आहे. खातेधारकाची ओळख पटवण्यासाठी फिंगर प्रिंटबरोबरच आय स्कॅनर असेल तर वृद्ध नागरिकांना या सेवेचा फायदा होईल.
निवृत्तीवेतन मिळण्यास वृद्धांसाठी सुकर
भारताच्या खेडोपाड्यात राहणाऱ्या नागरिकांना पेन्शन काढण्याकरिता CSC आणि मिनी बँक शाखेवर जावे लागते. मात्र, तेथे फिंगर प्रिंट घेण्यात काही अडथळा आला तर थेट बँकेच्या शाखेत जावे लागते. हे टाळण्यासाठी आता बँक सेंटर्सवर आय स्कॅनर बसवण्याचा विचार स्टेट बँक ऑफ इंडिया करत आहे. मात्र, भविष्यात सर्वच CSC सेंटर्स आणि बँक मित्र नेटवर्कवर ही सुविधा लागू होऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे देशभरात 8500 कॉमन सर्व्हिस पॉइंट आहेत.
आर्थिक समावेशकता आणण्यासाठी सरकारने ग्रामीण भागात अनेक योजना सुरू केल्या आहेत. बँक मित्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात त्यासाठी सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वृद्ध नागरिकांना घरपोच पेन्शन देण्याचीही तरतूद आहे. डोअरस्टेप बँकिंग सुविधा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वित्तीय संस्थांना 31 डिसेंबर 2017 आणि 30 एप्रिल 2020 अशा दोन अंतिम तारखा दिल्या होत्या. मात्र, अद्यापही ही सेवा पूर्णपणे भारतभर सुरू झाली नाही. नवीन खाते उघडणे, पैसे काढणे, जमा करणे, विमा, कर्ज, गुंतवणूक, सरकारी योजनांचा लाभ यासह इतरही अनेक सुविधा बँक मित्र या सुविधेद्वारे घरपोच मिळू शकते. काही ठराविक भागांमध्येच ही सुविधा सुरू आहे.
अनेक राज्यांतील गावोगावी कॉमन सर्व्हिस सेंटर्स पोहचली आहेत. मात्र, घरापर्यंत बँकिंग सेवा अद्यापही पूर्णपणे पोहचली नाही. इंडियन पोस्टद्वारेही घरपोच पेन्शन देण्यात येते. सर्वच बँकांना घरपोच सुविधा देणे अनिवार्य नाही. मात्र, भविष्यात त्या दिशेने प्रयत्न होऊ शकतात. काही शाखांना डोअरस्टेप सुविधा देणे अनिवार्य आहे तर इतर बँक शाखांना ‘best effort basis’ वर सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.