हवाई सेवेतील बजेट एअरलाईन्स स्पाईसजेटला 30 जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 205 कोटींचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने यंदा जबरदस्त कामगिरी केली. गेल्या वर्षी याच तिमाहीत स्पाईस जेटला 789 कोटींचा तोटा झाला होता. कंपनी नफ्यात आल्याने आज सोमवारी स्पाईस जेटचा शेअर 1.93% तेजीसह बंद झाला.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 17 कोटींचा नफा झाला होता. त्यात नव्या वर्षात वाढ झाली आहे. गो एअरची सेवा बंद झाल्याचा फायदा स्पाईस जेटला झाला आहे.
कंपनीने पहिल्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. त्यात जून अखेर कंपनीला 205 कोटींचा नफा झाला. सुटीचा हंगाम असल्याने आणि विमान प्रवासाची मागणी वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने सरासरी 90% क्षमतेसह व्यवसाय केला.
कंपनीला एकूण 2002 कोटींचा महसूल मिळाला आहे. याच तिमाहीत कंपनीने 1291 कोटींचा खर्च केला. कंपनीच्या प्रवर्तकांनी प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून 500 कोटींची गुंतवणूक केली.
स्पाईस जेटवर सुरक्षेच्या कारणास्तवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने कारवाई केली होती. यामुळे कंपनीची काही विमाने जमिनीवर होती. मात्र पहिल्या तिमाहीत तातडीची क्रेडीट लाईन वापरत ही विमाने सेवेत घेण्यात कंपनी व्यवस्थापनाला शक्य झाले. आता आणखी 25 विमाने सेवेत समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे.
आर्थिक वर्षाची तुलना केली तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 1725 कोटींचा तोटा झाला होता. तो तोटा आर्थिक वर्ष 2023 मध्ये कमी झाला. स्पाईस जेटला आर्थिक वर्ष 2023 मध्ये 1503 कोटींचा तोटा झाला होता. तोटा कमी करण्याबरोबच महसुलात वाढ झाल्याचे दिसून आले होते. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात 8869 कोटींचा महसूल मिळाला होता.
कंपनीसमोर आव्हानात्मक परिस्थिती असताना देखील पहिल्या तिमाहीत नफा नोंदवत चांगली कामगिरी केली.स्पाईस जेटमध्ये वृद्धीची मोठी क्षमता असल्याचा विश्वास स्पाईस जेटचे अध्यक्ष अजय सिंग यांनी व्यक्त केला आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी केलेली 500 कोटींची भांडवली गुंतवणूक कंपनीसाठी फायदेशीर ठरल्याचे त्यांनी सांगितले.
स्पाईस जेटचा शेअर वधारला
कंपनीने पहिल्या तिमाहीत नफा कमावल्यानंतर स्पाईस जेटच्या शेअरवर पडसाद उमटले. आज सोमवारी 14 ऑगस्ट 2023 रोजी स्पाईस जेटचा शेअर सकाळच्या सत्रात 6% ने वधारला होता. तो इंट्रा डेमध्ये 33.45 रुपयांवर गेला होता. दिवसअखेर तो 1.93% तेजीसह 31.70 रुपयांवर बंद झाला.