Tips while Writing Cheque: जेव्हा तुम्ही चेकवर सही करता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीस नमूद केलेले पेमेंट करण्यास कायदेशीर बांधिल असता. सही केलेला चेक पेमेंट करण्याचा कायदेशीर दस्तावेज समजला जातो. त्यामुळे चेकद्वारे व्यवहार करताना संपूर्ण माहिती भरण्यापासून ते शेवटी सही करण्यापर्यंत तुम्ही काळजी घ्यायला हवी.
चेक कोणाच्या नावे लिहत आहात आणि तो देण्याचा उद्देश काय याची सर्वप्रथम खात्री करून घ्यावी. कारण, सही केलेल्या चेकचा गैरवापर होऊ शकतो. त्यातून आर्थिक नुकसान आणि वाद उद्भवू शकतो. एकदम छोट्या वाटणाऱ्या मात्र, अत्यंत महत्त्वाच्या टीप्स फॉलो करून तुम्ही अडचण टाळू शकता.
खात्यातील रकमेची खात्री करा
चेक द्वारे व्यवहार करण्यासाठी खात्यात पुरेशी रक्कम आहे की नाही? याची खात्री करा. चेक बाऊन्स झाला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. एकापेक्षा जास्त बँक खाती आणि चेक बुक जर तुमच्याकडे असतील तर गोंधळ उडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही चेक लिहण्यापूर्वी बँके खात्यात चेकवर लिहलेल्या रकमेचे पेमेंट करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत का याची खात्री करा.
तारीख चुकवू नका
चेकवरील तारीख हा व्यवहार कधी होणार आहे याचा महत्त्वाचा पुरवा असतो. जर तुम्ही चेकवरील तारीख चुकवली तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. चुकीची तारीख लिहल्यास चेक रद्द होईल. घाईघाईत चुकीची तारीख टाकून नंतर खाडाखोड करू नका. तारीख नीट दिसली नाही तर चेक रद्द होऊ शकतो.
चेकवरील नाव चुकवू नका
तुम्ही ज्याच्या नावे लिहत आहात त्या व्यक्तीचे नाव किंवा कंपनीचे नाव अचूक लिहा. नावामध्ये स्पेलिंग च्या चुका करू नका. एखादी स्पेलिंगची चूकही नावात बदल करू शकते. असा चेक रद्द होण्याची जास्त शक्यता असते.
रक्कम दोनदा चेक करा
तुम्ही चेकवर जी रक्कम दिली आहे ती दोनदा काळजीपूर्वक चेक करा. तुम्ही समोरच्या व्यक्तीला जे पेमेंट करणार आहात त्यामध्ये जर काही चूक झाली तर अडचण निर्माण होईल, एक शून्य जरी वाढला तरी काय होईल, याची कल्पना तुम्ही करू शकता.
परमनंट इंक वापरा
चेक लिहताना कधीही परमनंट म्हणजेच सहज पुसली जाणार नाही अशा इंकचा वापर करा. कारण, चेकमधील माहिती बदलून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जी काही माहिती लिहाल ती सहजासहजी पुसता येणार नाही, अशा पेनने लिहा.
चेक नंबर लक्षात ठेवा
तुम्ही जो चेक लिहला आहे तो गहाळ झाला किंवा वठण्यास दिरंगाई झाली तर त्यावर ट्रॅक ठेवण्यासाठी तुम्ही चेक नंबर लक्षात ठेवायला हवा. भविष्यात काही अडचण किंवा वाद उद्भवल्यास तुम्ही बँकेला हा चेक नंबर देऊ शकता.
कोरा चेक कोणालाही देऊ नका
तुमच्याजवळील कोरा चेक कोणालाही देऊ नका. त्याचा गैरवापर होऊ शकतो. तसेच कोऱ्या चेकवर सही करुन कोणालाही देऊ नका. त्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पूर्ण माहिती भरून तपासून घ्या. त्यानंतरच चेक द्या. तसेच चेकबुक कोणाच्याही हाताला लागणार नाही, अशा पद्धतीने ठेवा.