Indian Railway Stocks: भारतीय रेल्वे कंपनीचा भाग असलेली रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) या कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्याभरात 70 टक्क्यांनी वाढ झाली. यावरून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Railway Finance Corporation) कंपनीचा शेअर 31 टक्क्यांनी आणि रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर 46 टक्क्यांनी वाढला आहे. टिटागड वॅगन्स (Titagarh Wagons) या खाजगी कंपनीचा शेअर्सही गेल्या वर्षभरात दुप्पट झाला आहे.
सरकारच्या रेल्वे कॅपेक्सवरील दबावामुळे रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचा इंटरेस्ट वाढू लागला आहे. त्यात केंद्राचा अर्थसंकल्प जवळ आल्यामुळे गुंतवणूकदारांकडून धोरणांमध्ये आणि निधीच्या वाटपामध्ये बदल करण्यासाठी जोर धरू लागल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. IRCTC सारख्या रेल्वेमधील सोयीसुविधांवर काम करणाऱ्या कंपनीपेक्षा रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वेच्या भांडवली खर्चात जवळपास दुप्पट वाढ!
2014 ते 2022 या कालावधील रेल्वेशी संबंधित विविध कामांवरील भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ 50 हजार कोटी रुपयांवरून 2.45 लाख कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. एकूणच केंद्र सरकारने रेल्वेच्या बाबतीत घेतलेल्या विविध निर्णयांमुळे भांडवली खर्चात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.2022-2023 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यातील खर्च 2 लाख 29 हजार 351 कोटी रुपयांवरून 3 लाख 42 हजार 889 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
रेल विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Limited)
रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअर्समध्ये एका महिन्यात 88 टक्क्यांनी वाढ झाली. 2 नोव्हेंबरला या शेअर्सची किंमत 39.95 रुपये इतकी होती. तर शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर, 2022) याची किंमत 75 रुपयांवर ट्रेडिंग करत होती. गेल्या सहा महिन्यात या शेअर्सची किंमत 116 टक्क्यांहून अधिक वाढली.
रेल्वेने भांडवली खर्चात वाढ केल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू लागला आहे. परिणामी रेल्वेशी संबंधित विविध कंपन्यांचे शेअर्स तेजीमध्ये येऊ लागले आहेत. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (Ircon International Ltd) कंपनीच्या शेअर्समध्ये कोरोनाकाळापासून 36 टक्क्यांनी वाढ झाली. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Railway Finance Corporation) कंपनीच्या महसुलात 2022 मध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.
विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी रेल्वे आपल्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काळात वाहनांची विक्री वाढल्यामुळे गाड्यांची ने-आण देखील वाढू लागली आहे. त्याचा रेल्वेलाही फायदा होत आहे. रेल्वेने वाहनांची ने-आण करण्याचे प्रमाण 68 टक्क्यांनी वाढले आहे. एकूणच रेल्वे प्रशासनाकडून विविध क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)