RBI on Interest Rate Hike: किरकोळ महागाई विरोधातील लढा अजूनही सुरू आहे. असे सांगत सांगत त्यात युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळेदेखील भारताला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते, असा सूचक इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
सध्याची जागतिक पातळीवरील आणि भारतातील स्थिती खूपच डायनॅमिक आहे. त्यात महागाईविरोधात सुरू असलेली भारताची लढाई अजूनही संपलेली नाही. या परिस्थितीवर आरबीआय अजून सूक्ष्म पद्धतीने काम करत आहे. येणाऱ्या काळात कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल माहित नाही. पण त्यातून सुखरूप कसे बाहेर पडता येईल, हे पाहावे लागणार आहे, असे गव्हर्नर दास म्हणाले आहेत. ते भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमात बोलत होते.
सर्वसामान्यांवर महागाईची टांगती तलवार कायम
मागील वर्षात मे पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरामध्ये 2.50 टक्के वाढ केली. त्यामुळे बँकांनीही होमलोनमध्ये जवळपास 1.5 ते 2.00 टक्क्यांपर्यंत वाढ केली. यामुळे सर्वसामान्यांचे जिणे मुश्किल झाले. एकीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. त्यात होमलोन आणि कर्जेही महाग झाल्यामुळे महिन्याभराचा खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे. ही कसरत अजून किती दिवस करावी लागणार आहे. याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. कारण एकीकडे जागतिक पातळीवर मंदी वातावरण पसरू लागले आहे. बऱ्याच कंपन्यांकडून नोकरकपात सुरू झाली आहे. त्यात व्याजदरांचे दर अजून वाढले तर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
आरबीआयने रेपो दर वाढवू नये
सर्वसामान्य आणि छोटे-मोठे व्यावसायिक, बँका यांच्याद्वारे मागणी होत आहे की, आगामी पतधोरणाच्या बैठकीत (RBO Monetary Policy Committee) आरबीआयने रेपो दरामध्ये वाढ करू नये. पण आरबीआयचे गव्हर्नर यांनी स्पष्ट केले की, हे माझ्या हातात नाही. रेपो रेट वाढवणे किंवा कमी करणे याला पूर्णपणे परिस्थिती जबाबदार आहे. जोपर्यंत जागतिक पातळीवर वातावरण नॉर्मल होत नाही आणि महागाई एका निश्चित अशा स्तरावर येत नाही. तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहू शकते.
किरकोळ महागाईचा दर काही प्रमाणात खाली आला आहे. पण त्याबाबत अजून ठोस काही सांगता येत नाही. पुढील आकड्यांमध्ये महागाईचा दर 4.7 टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता दास यांनी वर्तवली. त्यांनी असेही सांगितले की, सध्या भारतातील बँकिंग व्यवस्था मजबूत आहे. रोख रक्कम, लिक्विडिटी यामधील प्रमाण सुस्थितीत आहे.