Stock Market Live: शुक्रवारी सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर निफ्टी 17400 च्यावर ओपन झाला. तर सेन्सेक्समध्ये 373.34 अंकांची वाढ होऊन तो 59,282 अंकावर ओपन झाला. प्री-ओपनिंग मार्केटमध्ये साधारण 9.02 च्या आसपास सेन्सेक्स 148.49 अंकांनी तर निफ्टी 47.10 अंकानी वर होता. शेतीशी संबंधित सेक्टर सोडल्यास इतर सर्व सेक्टरमध्ये निराशाजनक वातावरण दिसून येत आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये खरीब पिकांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे शेतीशी निगडित सेक्टरमध्ये 3.7 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.
Table of contents [Show]
अमेरिकेतील कमी व्याजदराच्या निर्णयामुळे बाजारात तेजी
अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कमी वाढ करेल अशी शक्यता असल्याने शेअर मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. सेन्सेक्स जवळजवळ 600 अंकांची वाढ झाली. तर निफ्टी 17500 अंकावर गेला आहे. सेन्सेक्स निर्देशांकामधील 30 पैकी 27 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. तर निफ्टीमधील 50 पैकी 46 शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याचे दिसून आले. बॅंक निफ्टीमध्येही 12 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी उत्साह दाखवला.
फॉक्सकॉन भारतात करणार गुंतवणूक
उद्योग क्षेत्राचा उल्लेख करायचा झाला तर ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉन (Foxconn) भारतात प्लान्ट उभारण्याची योजना आखत आहे. या प्लान्टद्वारे फॉक्सकॉन भारतात 70 कोटी डॉलर रुपयांची गुंतवणूक करू शकते. फॉक्सकॉन ही आयफोन बनवणारी कंपनी आहे. कंपनीने चीनमधून बाहेर पडून भारतात उद्योग सुरू करण्याची योजना तयार केली. यातून भारतात सुमारे 1 लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
किर्ती इंडस्ट्रीजच्या शेअर्सने हिट केले अप्पर सर्किट
किर्ती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आज अप्पर सर्किट हिट केले. आज या शेअर्सने 10 टक्क्यांच्या वाढीसह 335.25 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. यामध्ये सिंगापूर कोर्टाने डायस्टार ग्लोबल मध्ये कंपनीचे 37.57 टक्क्यांच्या हिश्श्याचे मूल्य 60.38 कोटी डॉलर निश्चित केल्यामुळे किर्ती कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे बोलले जाते.
अदानी समुहातील कंपनींच्या शेअर्समध्ये वाढ
अमेरिकेतील गुंतवणूकदार कंपनी GQC ने अदानी समुहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने या कंपनींच्या शेअर्समध्ये आज तेजी आल्याचे दिसून येते.अदानी इंटरप्रायजेसचा शेअर 11 टक्क्यांनी वाढून ट्रेडिंग करत आहे. तर अदानी पोर्ट 7 टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर या कंपन्यांच्या शेअर्समध्येही 5 टक्क्यांनी वाढ झाली. अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स तेजीमध्ये आल्यानंतर सरकारी बॅंक एसबीआयमध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली. त्याचबरोबर युको बॅंक, युनियन बॅंक यामध्येही 4.50 ते 5 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.