जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचे पडसाद आज गुरुवारी भारतीय शेअर मार्केटमध्ये उमटले. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 250 अंकांनी घसरला. या पडझडीत गुंतवणूकदारांचे 5.5 लाख कोटींचे नुकसान झाले.
सध्या सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात आज घसरण झाली. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि महागाई यामुळे शेअर बाजारात अनिश्चितता पसरली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे.
सकाळी 11 वाजता सेन्सेक्स 834 अंकांनी घसरला असून तो 63214 अंकावर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 254 अंकांच्या घसरणीसह 18867 अंकांवर ट्रेड करत आहे.
कालच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये 4237 कोटींची विक्री केली होती. दुसऱ्या बाजूला स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3569 कोटींचे शेअर्स खरेदी केले होते.
निफ्टीवर अदानी एंटरप्राईसेसच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. व्ही मार्ट रिटेल, अदानी गॅस, पॉलिप्लेक्स कॉर्प, एजिस लॉजेस्टीक, आरती इंडस्ट्रीज, अदानी विल्मर या शेअरमध्ये घसरण झाली आहे. आज झोमॅटोचा शेअर 4.98% ने घसरला आहे. महिंद्रा अॅंड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, हिंदाल्को या शेअरमध्ये आज 2% पर्यंत घसरण झाली. अॅक्सिस बँक हा निफ्टी 50 मधील एकमेव शेअर तेजीत आहे.
बीएसई मंचावर एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एलअॅंडटी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, टाटा मोटर्स हे महत्वाचे शेअर घसरले आहेत.
सहा सत्रात गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केटमध्ये सलग सहाव्या सत्रात घसरण झाली आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्य 309.22 लाख कोटी इतके आहे. मागील सहा सत्रात गुंतवणूकदारांचे 20.14 लाख कोटी बुडाले आहेत.