शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. काल शुक्रवारी सेन्सेक्सने पुन्हा 63000 अंकांची पातळी ओलांडली. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीच्या लाटेवर आणखी किती मजल मारणार याबाबत शेअर बाजार विश्लेषक आणि ब्रोकर्सकडून विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत. केडिया सिक्युरिटजचे एमडी विजय केडिया यांनी पुढील दोन वर्षात सेन्सेक्स 84000 पातळीपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे.
विजय केडिया हे शेअर बाजारातील अनुभवी विश्लेषक म्हणून ओळखले जातात. केडिया यांच्या मते पुढील दोन ते तीन वर्षात मिडकॅप कंपन्यांची कामगिरी सुधारेल. यामुळे शेअर इंडेक्सला पाठबळ मिळेल. दोन वर्षात सेन्सेक्स 84000 अंकांवर जाईल. सेन्सेक्ससाठी 100000 अंकांपर्यंत जाणे हा मैलाचा दगड असेल, असे केडिया यांनी सांगितले. इकॉनॉमिक्स टाईम्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केडिया यांनी शेअर बाजाराच्या पुढील वाटचालीवर भाष्य केले.
केडिया म्हणाले की आपण आठवड्याचे सातही दिवस 24 तास शेअर मार्केटचा विचार करतो. शेअर मार्केट मला कायम व्यस्त ठेवते, असे केडिया यांनी सांगितले. 2003 नंतर शेअर मार्केटने अनेक चढ उतार अनुभवले आहेत. कोरोनोसारख्या महामारीनंतर शेअर बाजाराने जबरदस्त उसळी घेतली असल्याचे केडिया म्हणाले.
केडिया यांच्यामते सेन्सेक्स सध्या 21000 च्या पटीत नवनवीन टप्पे गाठत आहे. जर मागे वळून बघितले तर सेन्सेक्सने 21000, 42000 आणि आता 63000 अंकांचा टप्पा ओलांडला. आता पुढील टप्पा 84000 अंकांचा असेल, असा अंदाज केडिया यांनी व्यक्त केला. दोन वर्षात सेन्सेक्स 84000 अंकावर जाईल, असे त्यांनी सांगितले.
केडिया यांनी या मुलाखतीत आपली गुंतवणूक रणनिती सांगितली. ते SMILE या सूत्रानुसार गुंतवणूक करतात. ज्यात लहान आकाराच्या मात्र मध्यम अनुभव आणि मोठ्या आकांक्षा असलेल्या कंपन्यांची ते गुंतवणुकीसाठी निवड करतात.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)