शेअर मार्केटमध्ये आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 30 अंकांची घसरण झाली.
आजच्या सत्रात बाजारात आयटी आणि बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. इन्फोसिस, एलअॅंडटी, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, एनटीपीसी, आयटीसी, टाटा मोटर्स, विप्रो, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, नेस्ले, जेएसडब्ल्यू स्टील या शेअरमध्ये वाढ झाली.
शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी नफावसुली दिसून आली होती. सेन्सेक्स 888 अंकांनी कोसळला होता. त्यातून अद्याप बाजार सावरलेला नाही. सध्या सेन्सेक्स 161 अंकांनी कोसळला असून तो 66522 अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टीत 16 अंकांची घसरण झाली असून तो 19729 अंकांवर ट्रेड करत आहे.
बाजारात तिमाही निकालांचे पडसाद उमटत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर आज तेजीत आहेत. पहिल्या तिमाहीत कॅनरा बँकेने चांगली कामगिरी केली. याशिवाय गृह वित्त पुरवठादार कंपन्यांच्या शेअरला गुंतवणूकदारांकडून मागणी आहे. धानी सर्व्हिसेस, कॅनफिन होम्स लिमिटेड, क्रेडीट अॅक्सिस ग्रामीण लिमिटेड, पीएनबी हौउसिंग फायनान्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, महिंद्रा अॅंड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस या शेअरमध्ये 1 ते 10% वाढ झाली.
आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2.48% ने घसरला. पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात 11% घसरण झाली. ऑईल टू केमिकल या विभागात खराब कामगिरीने कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला. या आकडेवारीने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची विक्री केली. सध्या तो 2475 रुपयांवर ट्रेड करत आहे.