मागील दोन आठवडे तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या शेअर निर्देशांकात आज शुक्रवारी नफावसुली दिसून आली. नफेखोरांनी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात चौफेर विक्री करुन नफा कमावला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 505 अंकांनी कोसळला आणि तो 65280 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 165 अंकांच्या घसरणीसह 19331 अंकांवर स्थिरावला.
आज सकाळपासून बाजारावर दबाव दिसून आला. आयटी कंपन्या, बँका, मेटल, ऑटो यासारख्या क्षेत्रात ब्लुचिप शेअर्सची गुंतवणूकदारांनी विक्री केली. बाजार बंद होताना सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 26 शेअर घसरणीसह स्थिरावले.
सेन्सेक्स मंचावरील जे बडे स्टॉक घसरले त्यात टीसीएस, विप्रो, भारती एअरटेल, रिलायन्स, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, आयटीसी, टाटा स्टील, नेस्ले, एचडीएफसी, इन्फोसिस, कोटक बँक, एलअॅंडटी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एनटीपीसी, पॉवरग्रीड या शेअरमध्ये घसरण झाली.
बँकांना देखील आज नफावसुलीचा फटका बसला. करुर वैश्य बँक, एयू स्मॉल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आरबीएल बँक, इंड्सइंड बँक, येस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे शेअर 1 ते 3 % घसरले.
जागतिक पातळीवर शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आली. त्याचे पडसाद आज भारतीय बाजारांत उमटले. गुंतवणूकदारांनी आज नफावसुली करुन पैसे काढून घेतले. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळला असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले. ते म्हणाले की अमेरिकेत रोजगार संधी वाढल्या आहेत. ज्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या जुलैमधील बैठकीत दरवाढीला विराम दिला जाईल,अशी शक्यता नायर यांनी व्यक्त केली.
रिअल्टी कंपन्या तेजीत
आज स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूकदारांनी खरेदी केली. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामहिन्यात प्रमुख शहरात घरांची विक्री वाढली आहे. रिअल्टी मार्केट तेजीत असल्याने गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला. सनटेक रिअल्टी, विवो कोलॅबोरेशन, पीव्हीआर आयनॉक्स, शोभा, फिनिक्स मिल्स, ग्रॅन्युलेज इंडिया हे शेअर 2 ते 12% वधारले.
मीडिया कंपन्यांचे शेअर वधारले
आज शेअर मार्केटमध्ये चौफेर विक्री सुरु असली तरी प्रसार माध्यम क्षेत्रात तेजी दिसून आली. दिवसअखेर मिडियातील प्रमुख शेअर तेजीसह बंद झाले. झी एंटरटेंमेंट 9.69% ने वधारला आणि तो 207.70 रुपयांवर स्थिरावला. आज झी एंटरटेंमेंटच्या शेअरमध्ये ब्लॉकडील दिसून आली. 11 लाख शेअर्सचा ट्रेड झाला. ज्यामुळे कंपनीचा शेअरवर परिणाम दिसून आला. पीव्हीआर आयनॉक्सचा शेअर 4.32% तेजीसह 1434.45 रुपयांवर बंद झाला. डीश टीव्हीचा शेअर 4% ने वधारला. नेटवर्क 18 1.26% आणि टिव्ही 18 ब्रॉडकास्ट हे शेअर वधारले.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            