Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Nifty Crash Today: शेअर मार्केटमध्ये प्रचंड पडझड, सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले

Sensex Fall

Sensex Nifty Crash Today: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतासह प्रमुख उदयोन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला. यामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला होता. पुढे ही घसरण 700 अकांपर्यंत वाढली.

शेअर मार्केटमध्ये आज बुधवारी 20 सप्टेंबर 2023 रोजी प्रचंड पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीत 200 अंकांची घसरण झाली. यामुळे निफ्टी निर्देशांक 20000 अंकांच्या पातळीखाली आला आहे. या घसरणीने गुंतवणूकदारांचे किमान 2 लाख कोटी बुडाल्याचे बोलले जाते.

अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. त्यापाठोपाठ बँक ऑफ जपान देखील प्रमुख व्याजदरात वाढ करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम जगभरातील भांडवली बाजारांवर दिसून आला.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतासह प्रमुख उदयोन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला. यामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला होता. पुढे ही घसरण 700 अकांपर्यंत वाढली. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी एलअ‍ॅंडटी, आयसीआयसीआय बँक, इंड्सइंड बँक, सन फार्मा आणि अ‍ॅक्सिस बॅंक या पाच कंपन्या वगळता 25 शेअर घसरले आहेत.

सध्या सेन्सेक्स 691 अंकांच्या घसरणीसह 66907.38 अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200.25 अंकांच्या घसरणीसह 19933.05 अंकांवर ट्रेड करत आहे. 

बँका, वित्त संस्था, रिअल इस्टेट, आयटी, पॉवर, ऑटो या क्षेत्रातील प्रमुख शेअर्सची विक्री करुन गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले. बीएसईवर पॉवरग्रीड, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, टीसीएस, आयटीसी, नेस्ले, एसबीआय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव 94 डॉलरपर्यंत गेला आहे. तो लवकरच 100 डॉलरचा टप्पा ओलांडेल, असे बोलले जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयातील अवमूल्यन अद्याप सुरुच आहे. भारत आणि कॅनडा यांच्यामधील ताणलेले संबंध, बँक निफ्टीवरील दबाव आणि सेंट्रल बँकांचे व्याजदर वाढीचे संकेत यामुळे नजीकच्या काळात अनेक आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. याचा सारासार विचार करुन गुंतवणूकदारांनी आज चौफेर विक्री करुन पैसे काढून घेतल्याचे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्लेषक डॉ. व्ही.के विजयकुमार यांनी व्यक्त केले.