Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Nifty Crash: मध्य पूर्वेत युद्धाचा भडका, शेअर बाजारात मोठी घसरण

Sensex crashed

Sensex Nifty Crash:आजच्या सत्रात माहिती आणि तंत्रज्ञान वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 27 शेअर घसरले.

हमासने इस्राईल यांच्या युद्धाचा भडका उडाल्याने आज सोमवारी 9 ऑक्टोबर 2023 रोजी जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. भारतीय शेअर निर्देशांक सेन्सेक्स 483 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 141 अंकांच्या घसरणीसह 19512.35 अंकांवर स्थिरावला. आजच्या पडझडीने गुंतवणूकदारांचे अडीच लाख कोटींचे नुकसान झाले. 

जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा एकदा मध्य पूर्वेक़डे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. त्यांनतर जगभरात त्याचे पडसाद उमटले होते. खनिज तेलाचा भाव 141 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढला होता. या युद्धानंतर युरोपात आणि अमेरिकेत महागाईचा भडका उडाला होता. 

रविवारी हमासने इस्त्राईलवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना इस्त्राईलकडून गाझा पट्टीत क्षेपणास्र डागण्यात आली. दोन्ही बाजूने युद्धाचा भडका उडाला असून यात जवळपास 1100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युद्ध भडकल्याने जगभरातील गुंतवणूकदारांचा थरकाप उडाला आहे. त्यांनी शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. 

आजच्या सत्रात माहिती आणि तंत्रज्ञान वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 27 शेअर घसरले. एचसीएल टेक, टीसीएस आणि एचएयूल हे किरकोळ तेजीसह वधारले. 

इन्फोसिस, नेस्ले, टेक महिंद्रा, भारतीएअरटेल, इंड्सइंड बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, विप्रो, पॉवरग्रीड, आयटीसी, टाटा मोटर्स, सन फार्मा, एनटीपीसी, एलअँडटी, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, रिलायन्स, एचडीएफसी बँक, टायटन, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय या शेअरमध्ये घसरण झाली.