गुंतवणूकदारांची चौफेर खरेदी आणि परदेशी गुंतवणुकीचा वाढता ओेघ यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट धडकली आहे. आठवडाभरात सेन्सेक्सने 1000 अंकांची झेप घेतली असून आज सोमवारी 3 जुलै 2023 रोजी तो 65000 अंकांवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 19300 अंकांवर गेला आहे. त्यात 127 अंकांची वाढ झाली.
आजच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. सकाळी सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ झाली होती. बँका, वित्त संस्था, ऑटो कंपन्या, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी आहे.
सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 21 शेअर वधारले. ज्यात महिंद्रा अॅंड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एसबीआय, टाटा स्टील, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एलअॅंडटी, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, आयटीसी, टीसीएस, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, इंड्सइंड बँक या शेअरमध्ये वाढ झाली. दुसऱ्या बाजूला भारती एअरटेल, टायटन, एचसीएस टेक, मारुती, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, सन फार्मा, अॅक्सिस बँक, पॉवरग्रीड या शेअरमध्ये घसरण झाली.
दुपारी 1.30 वाजता मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 485 अंकांच्या वाढीसह 65198 अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 130 अंकांच्या तेजीसह 19319 अंकावर ट्रेड करत आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 64000 अंकांची पातळी ओलांडली होती.
जगभरातील प्रमुख शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. महागाई कमी करण्यासाठी तेथील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात तब्बल 5% इतकी वाढ केली होती. अमेरिकेत मंदी येणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये खरेदीचा ओघ सुरुच ठेवला. भारतासारख्या उदयोन्मुख मार्केट्सना याचा मोठा फायदा झाला असल्याचे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक तज्ज्ञ डॉ. व्ही.के विजयकुमार यांनी व्यक्त केले.
पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल लवकरच कॉर्पोरेट्सकडून जाहीर केले जाणार आहेत. जून महिन्यातील जीसएटीची आकडेवारी, वाहन विक्री आणि एकूण अर्थचक्राला मिळालेली गती यामुळे मार्केटमध्ये सध्या सकारात्मक वातावरण असल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे.
IT शेअर्सवर विक्रीचा दबाव
शेअर मार्केटमध्ये तेजीचा ओघ आणि सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड सुरु असताना माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सवर दबाव दिसून आला. पर्सिस्टंट सिस्टमचा शेअर 2.37% ने घसरला असून तो 4892.35 रुपयांपर्यंत खाली आला. त्याशिवाय ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस, सोनाटा सॉफ्टवेअर, कोफोर्ज, एलटीआय माईंट ट्री हे शेअर घसरले आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीए आणि एचसीएल टेक या दोन कंपन्यांकडून 12 जुलै 2023 रोजी पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. इन्फोसिस 20 जुलै 2023 रोजी पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करेल.