Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Selling Your Home: घर विकायचंय, चांगली किंमत मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!

How to sell house

Image Source : www.king5.com / www.hindustantimes.com

Selling Your Home: घर विकताना त्याला चांगली किंमत मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्याचवेळी घर विकत घेणाऱ्यालाही वाटत असते की, आपल्याला कमी किमतीत चांगले घर मिळावे. अशावेळी काही टिप्स नक्कीच उपयोगी पडतात. चला तर मग जाणून घेऊया घर विकण्याच्या टिप्स...

Selling Your Home: प्रत्येकाची इ्च्छा असते की स्वत:चं घर असावं. मग यात काही जण प्रथमच घर घेणारे असतात. तर काही जणांनी गुंतवणूक म्हणून घर खरेदी केलेले असते. तर काही जणांना राहते घर विकून नवीन घर घ्यायचे असते. अर्थातच आपले जुने घर विकताना प्रत्येकाला त्याची चांगली किंमत हवी असते. ती कशी मिळवायची याच्या काही साध्यासोप्या टिप्स आमची तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

घर विकण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की मोठं घर हवंय. नोकरी दुसऱ्या शहरात लागली. परदेशात स्थायिक व्हायचंय, घर विकण्याची अशी काहीही कारणे असू शकतात. पण घर विकणे हे वाटते तितके आता सोपे राहिलेले नाही. कारण नवीन घर घेताना आपल्या जशा काही अपेक्षा असतात. त्याचप्रमाणे घर विकत घेताना दुसऱ्याच्याही किमान अपेक्षा असणार. त्या अपेक्षांची पूर्तता झाली तरच घर विकले जाऊ शकते. नाहीतर खरेदीदारांसाठी महिनोमहिने वाट पाहावी लागते. तुम्हाला जर या त्रासातून सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला काही आयडियाज् सांगणार आहोत.

चांगला रिअल इस्टेट एजंट शोधा

पूर्वीसारखे ओळखीने घर विकण्याचे किंवा खरेदी करण्याचे दिवस गेले. नातेवाईकांनी सांगितलंय म्हणजे घर चांगले असेल. याचे दिवस आता गेले. सध्या शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये रिअल इस्टेट एजंटशिवाय घर विकलेच जात नाही. त्यात तुम्हाला जर तुमच्या घराची चांगली किंमत हवी असेल तर तुमच्याकडे एक चांगला एजंट असणे गरजेचा आहे. जो तुमच्यावतीने ग्राहकांशी बोलेल. त्यांना घराची माहिती देईल. किंमत सांगेल. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्या घराला चांगली किंमत देणारा खरेदीदार मिळेल.

घराची दुरुस्ती करा

घर विकण्यापूर्वी त्याला चांगली किंमत मिळावी, अशी तुमची अपेक्षा असेल तर घर चांगल्या स्थितीत असणे खूप गरजेचे आहे. जसे की, घरामध्ये काही गोष्टींची पडझड झाली असेल, तर ती दुरूस्त करून घेतली पाहिजे, नाहीतर खरेदीदार त्याची किंमत कमी ठरवतात. घर पाहताना आपल्याला काही खटकत नाही ना. याची उजळणी करणे गरजेचे आहे. जे आपल्यालाच आवडत नाही. ते दुसऱ्याला कसे आवडू शकते. यासाठी घर विकताना ते सुस्थितीत आहे ना, हे कटाक्षाने पाहावे.

घर स्वच्छ ठेवा

स्वत:चे घर विकत घेणे, ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामागे खूप साऱ्या भावना देखील असतात. त्यामुळे घर पाहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना ते स्वच्छ आणि प्रसन्न वाटेल असे ठेवले पाहिजे. प्रसन्न वातावरणामुळे कदाचित तुम्हाला चांगली किंमत देखील मिळू शकते. कारण बऱ्याचदा घर घेताना समाधान ही गोष्ट प्रामुख्याने पाहिली जाते.

घराचे चांगले फोटो काढा

आपल्याच घराचे चांगले फोटो काढून ते इस्टेट एजंट दिले पाहिजेत. तसेच ते घरांची खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवरही टाकले पाहिजेत. फोटोतून घर सुंदर आणि ऐसपैस दिसत असेल तर ते प्रत्यक्षात पाहिले जाते. त्यामुळे घराची विक्री करताना त्याचे चांगले फोटो काढून लोकांना दाखवले पाहिजे.

परिसरातील घरांच्या किमतींचा अंदाज घ्या

घर विकत घेणारे आणि विकणारे दोघेही आपल्या परिसरात साधारण घरांचा काय रेट सुरू आहे. हा विचारात घेऊन त्याची किंमत ठरवत असतात. तर काही जण त्या घरातील फर्निचर, इंटेरिअर किंवा इतर अॅमेनिटीजचा समावेश करून किंमत सांगतात. अशावेळी आपली किमत अवास्तव वाटू नये, म्हणून इतर घरांची काय किंमत आहे. याचा अभ्यास करून आपल्या घराची किंमत ठरवावी.

घराचा लगेच ताबा देण्याची ऑफर

घर विकत घेण्याचा किंवा विकण्याचा निर्णय लगेच घेतला जात नाही. पण तरीही तुम्ही व्यवहारानंतर लगेच घराचा ताबा दिला जाईल, असे सांगितल्याने तुमचा व्यवहार लगेच आणि फायद्याचा ठरू शकतो. बऱ्याचदा अनेकांना जुने घर सोडण्यासाठी सांगितलेले असते. त्यामुळे त्यांना लगेच नवीन घरात शिफ्ट होईल, अशा घरांच्या शोधात असतात. त्यांच्याकडून तुम्हाला चांगली आणि अपेक्षित किंमत मिळू शकते.

अशाप्रकारे तुम्ही वरील टिप्सचा वापर करून तुमच्या घराची विक्री करू शकता. यातून तुम्हाला नक्कीच चांगली किंमत मिळण्यास मदत होऊ शकते.