वस्तू विनियम करणाऱ्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजचा शेअर बाजार नियंत्रक सेबीने झटका दिला आहे. पुढील महिन्यापासून एमसीएक्सकडून सुरु होणाऱ्या नवीन कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह श्रेणीला सेबीने विरोध केला आहे. तूर्त गुंतवणुकीचा हा नवीन पर्याय सुरु न करण्याचे आदेश एमसीएक्सला देण्यात आले. याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटले. एमसीएक्सचा शेअर आज शुक्रवारी 8% कोसळला.
कमॉडिटी ट्रेडिंगमधील प्रमुख व्यासपीठ म्हणून एमसीएक्सची ओळख आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजकडून कमॉडिटी डेरिव्हेटीव्हज प्लॅटफॉर्म येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरु करण्याची घोषणा केली होती. मागील अनेकदा उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. त्याशिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
एमसीएक्सच्या नव्या कमॉडिटी डेरिव्हेटीव्ह प्लॅटफॉर्मवर चेन्नईतील 'सीएफएमए' या गुंतवणूकदारांच्या एका समूहाने आक्षेप घेतला होता. कमॉडिटी डेरिव्हेटीव्हजबाबत स्वतंत्र गुंतवणूक व्यासपीठ चालण्यास एमसीएक्स तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही, असा आरोप करत 'सीएफएमए'ने मद्रास हायकोर्टात डिसेंबर 2022 मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.
'सीएफएमए' ने शेअर बाजार नियंत्रक सेबीकडे देखील एमसीएक्स विरोधात तक्रार केली होती.अखेर या प्रकरणी सेबीने दखल घेऊन कमॉडिटी डेरिव्हेटीव्हची श्रेणी तूर्त सुरु न करण्याचे आदेश एमसीएक्सला दिले आहेत.
'सीएफएमए'ने केलेल्या तक्रारीनुसार हे प्रकरण तांत्रिक मुद्द्यांचे आहे. त्यामुळे सेबीच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीसमोर या प्रकरणी तपशील सादर करावा, असे आदेश सेबीने एमसीएक्सच्या व्यवस्थापनाला दिले आहेत.
एमसीएक्सने नवीन गुंतवणूक व्यासपीठ सुरु करताना कायद्यानुसाच सर्वंकष चाचण्या पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता केवळ मॉक टेस्ट करुनच कमॉडिटी डेरिव्हेटिव्हज प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा प्रयत्न एमसीएक्सकडून करण्यात आला.
MCX चा शेअर कोसळला
शेअर मार्केट रेग्युलेटर सेबीने एमसीएक्सला नवीन कमॉडिटी डेरिव्हेटीव्हज प्लॅटफॉर्म सुरु करण्यास रोखल्याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले. आज शुक्रवारी 29 सप्टेंबर 2023 रोजी MCX चा शेअर 8.7% कोसळला. तो 1914.60 रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत खाली आला होता. 30 जून 2023 नंतर एकाच दिवसात एमसीएक्सच्या शेअरमधील ही मोठी घसरण ठरली. दरम्यान दुपारनंतर एमसीएक्सचा शेअर सावरताना दिसला. दुपारी 2.30 वाजता हा शेअर 2102.45 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यात 0.10% घसरण झाली.