Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rural vehicle sale: ग्रामीण भागात दुचाकींची विक्री 7 वर्षात सर्वात कमी; ट्रॅक्टर खरेदीही रोडावली

Rural vehicle sale

ग्रामीण भागात ट्रॅक्टर विक्री रोडावली असून दुचाकींची विक्री मागील सात वर्षात सर्वात कमी झाली आहे. कोरोनानंतर विक्री वाढत आहे. मात्र, कोरोनापूर्व काळात जी विक्री होती, तिथपर्यंत पोहचली नाही. अवकाळी पाऊस, एलनिनोमुळे मान्सूनवर संकट तसेच कडक उन्हामुळे ग्रामीण बाजारपेठ उभी राहण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदीला शेतकऱ्यांची पसंती असते. मात्र, नव्या टॅक्टरची विक्री रोडावली.

Rural vehicle sale: कोरोनानंतर देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था अद्यापही रुळावर आली नाही. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ग्रामीण बाजारपेठ सुरळीत होण्याची आशा होती. मात्र, तसे झाले नाही. रोजगाराच्या संधी, नागरिकांचे उत्पन्न आणि बाजारातील खरेदी रोडावल्याचे दिसून आले. लहरी हवामानाचा फटकाही ग्रामीण भागाला बसला. आता एलनिनोमुळे मान्सूनला धोका निर्माण झाला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ग्रामीण भागात मागील सात वर्षात दुचाकींची विक्री सर्वात कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच शेती कामासाठी आवश्यक वाहन असलेल्या ट्रॅक्टरची विक्री कमी होत आहे. 

Federation of Automobile Dealers Associations (FADA) ग्रामीण भागातील वाहनांच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. रब्बी हंगामाचे पिक शेतकऱ्यांच्या हातात आले आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे गहू, द्राक्षे, हरभरासह इतरही पिके आणि फळांचे नुकसान झाले. कोरोनानंतर रुरल इकॉनॉमी सुधारत आहे. मात्र, कोरोनापूर्व काळातील विकासदर अद्याप साधलेला नाही. ट्रॅक्टरची विक्री वार्षिक 12% दराने वाढत आहे. मात्र, ही वाढ कोरोनापूर्व काळातील आकडेवारीपेक्षा 9 टक्क्यांनी कमी आहे.

यावर्षी भारतातील अनेक भागात उन्हाळ्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचा परिणाम कृषी उत्पन्नावर होऊ शकतो. पंजाब, हरियाणा आणि मध्यप्रदेशमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाचे नुकसान झाले. जर एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला तर आणखी परिस्थिती गंभीर होऊ शकते.

खासगी वाहने, तीनचाकी, प्रवासी वाहने, दुचाकींच्या विक्रीपेक्षा ट्रॅक्टरची विक्री फारच कमी झाली. संपूर्ण वर्षभरात ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी निराशाजनक राहीली. कोरोनासाथीमध्ये दोन वर्ष गेले. त्यानंतर 2022 वर्षाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

वाहन दरवाढीचा परिणाम

कोरोनानंतर कच्चा माल आणि सुट्या पार्ट्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनांच्याही किंमती वाढल्या. खालच्या श्रेणीतील दुचाकींच्या किंमतीही 1 लाखांच्या जवळ गेल्या आहेत. त्यातच आता BS6 चा दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांमध्ये वेगळे डिव्हाइसेस बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या किंमतीही वाढल्या आहेत. पुढील काही महिन्यांत वाहनांची दरवाढ जर आणखी झाली तर ग्रामीण भागातील विक्री आणखी रोडावेल.