रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज बुधवारी 19 जुलै 2023 रोजी शेअर बाजारात वर्षभराचा उच्चांक गाठला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2855 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला. एप्रिल 2022 नंतरचा हा उच्चांकी स्तर आहे. या आठवड्याअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
उद्या गुरुवारी 20 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विभाजन होणार आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने या विभाजनाला मंजुरी दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार या व्यवहारासाठी 20 जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे बोलले जाते.
गेल्या वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेअर बाजारात स्वतंत्रपणे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस सूचीबद्ध करण्यात येणार ते जाहीर करण्यात आले होते.
या विभाजनासाठी 1:1 असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. रिलायन्सचा प्रत्येकी एक शेअर बाळगणाऱ्या गुंतवणूकदाराला जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा एक शेअर मिळणार आहे.
जिओ फायनान्शिअलचे विभाजन करण्याच्या घोषणेनंतर मागील काही सत्रांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअरची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. या तेजीने आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठल्याचे मेहता सिक्युरिटीजचे शेअऱ बाजार विश्लेषक प्रशांत तापसे यांनी सांगितले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज बाजार बंद होताना 2840 रुपयांवर स्थिरावला. त्यात 0.62% वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 1921515.61 कोटी इतकी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM कडे गुंतवणूकदारांचे लक्ष
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) या महिनाअखेरीस होण्याची शक्यता आहे. या सभेत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त केलेल्या जिओ फायनान्शिअलच्या आयपीओसंदर्भात या सभेत अंबानी यांच्याकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.