सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना भांडवलाची चणचण जाणवू लागली आहे. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियमने राईट इश्यूच्या माध्यमातून 18000 कोटी उभारण्याचे जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ इंडियन ऑईलने देखील अशाच प्रकारचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
भारत पेट्रोलियमच्या 28 जून 2023 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 18000 कोटींच्या राईट इश्यूच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पात्र समभागधारकांना राईट इश्यूमध्ये सहभागी होता येणार आहे.
इंडियन ऑईल कंपनीने देखील राईट इश्यूचा प्रस्ताव तयार केला आहे. शेअर बाजाराला यासंबधी कंपनीने माहिती दिली. येत्या 7 जुलै 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यात राईट इश्यूच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे. इंडियन ऑईलमध्ये केंद्र सरकारची मालकी हिस्सेदारी आहे. कंपनीची भांडवलाची गरज भागवण्यासाठी सरकार देखील राईट इश्यूमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोलियम कंपन्यांसाठी केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 30000 कोटींची तरतूद केली आहे. या कंपन्यांना सरकार भांडवली सहकार्य करणार आहे. मात्र कंपन्यांसाठी ही मदत खूपच कमी असल्याने राईट इश्यूच्या माध्यमातून भांडवलाची कमतरता भरुन काढण्याची तयारी कंपन्यांनी केली आहे.
इंडियन ऑईलने चालू आर्थिक वर्षासाठी 30395 कोटींचे भांडवली खर्चाचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा खर्च 13.7% कमी आहे. इंडियन ऑईल प्रमाणेच तिसरी पेट्रोलियम कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून देखील भांडवली उभारणीसाठी राईट इश्यू जाहीर केला जाणार का, याची उत्सुकता गुंतवणूकदारांना लागली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर वधारले
आज बुधवारी 5 जुलै 2023 रोजी पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. भारत पेट्रोलियम कंपनीचा शेअर 386.25 रुपयांवर बंद झाला. त्यात 2.56% वाढ झाली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली. दिवसअखेर IOC 95.52 रुपयांवर बंद झाला. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा शेअर आज 4.14% तेजीसह 290.75 रुपयांवर स्थिरावला.