खाद्यवस्तू, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईला रोखण्यासाठी व्याजदर वाढवून ग्राहकांच्या क्रयशक्तीला रोखण्याचे प्रयत्न रिझर्व्ह बँक करत आहे. मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात आतापर्यंत तब्बल 2.50% वाढ केली आहे. महागाई रोखणे या एकमेव टार्गेटवर लक्ष केंद्रीत केलेली रिझर्व्ह बँक दरवाढ सुरुच ठेवणार कि काही काळ विराम देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. (RBI to announce first monetary policy on 6th April 2023 may continue rate hike)
पतधोरण समितीची नवीन आर्थिक वर्षातील पहिली बैठक मुंबईत 3 एप्रिलपासून सुरु झाली आहे. गुरुवारी 6 एप्रिल 2023 रोजी बँकेकडून पतधोरण जाहीर केले जाईल. मे 2022 पासून आरबीआयने नॉनस्टॉप रेपो दरवाढ करुन उद्योजक आणि कर्जदारांना बेजार केले आहे. सलग सहावेळा बँकेने रेपोदरात वाढ केली. यामुळे एप्रिल 2022 मध्ये 4% वर असलेला रेपो दर आता 6.50% इतका वाढला आहे. मात्र इतके करुन देखील महागाईचा तोरा मात्र कमी झालेला नाही. अजूनही देशांतर्गत बाजारात महागाई 6% आहे. वाढत्या महागाईने सामान्यांच्या उत्पन्नावर आणि बचतीला मोठा फटका बसत आहे. हवमान बदल आणि अवकाळी पावसाचा फटका, कृषी उत्पादनातील संभाव्य घट, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक बाजारातील इंधन महागाई अशा घटकांनी भारतीयांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे.
दुसऱ्या बाजूला रेपो दरवाढीचा विपरित परिणाम बँकांच्या कर्ज व्यवसायावर झाला आहे. रेपो दरवाढीचे ओझे बँकांनी लागलीच ग्राहकांना लादून हात झटकले. मागील 10 महिन्यात बँकांमधील सर्वच प्रकारची कर्जे महागली आहे. गृह कर्जाचा किमान व्याजदर 9.50% पुढे गेला आहे. वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, उद्योजकांसाठी छोटी मोठी कर्ज इतकच काय सोनं तारण कर्ज अशा कर्जांचे व्याजदर मागील 10 महिन्यांत कमालीचे वाढले आहे. याचा फटका कर्जाचा मागणीवर दिसून आला. ज्याप्रकारे बँकांनी कर्ज महाग केली तशाच प्रकारे ठेवींचे दर देखील वाढवले आहेत. वाढत्या महागाईत ठेवीदारांना मात्र किंचित दिलासा मिळाला आहे.
बाजारात तूर्त रोकड तरलतेबाबत फारसी गंभीर स्थिती नाही. त्यामुळे गुरुवारी रिझर्व्ह रेपोचा दर पुन्हा एकदा 0.25% ने वाढवेल, असा अंदाज बहुतांश अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केअर रेटिंग्जच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांच्या मते फेडरल रिझर्व्ह प्रमाणेच रिझर्व्ह बँक देखील रेपो दरवाढीचा सपाटा कायम ठेवले. आरबीआय रेपो दरात 0.25% वाढ करेल, असा अंदाज सिन्हा यांनी व्यक्त केला. एचडीएफसी बँकेने जाहीर केलेल्या अहवालात रेपो दरात 0.40% वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एचडीएफसी बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ अभिक बरुआ यांच्यामते आरबीआय किमान 40 बेसिस पॉइंटने व्याजदर वाढवू शकते. काही जणांच्या मते कदाचित जगभराती बँकिंग क्रायसेसची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आरबीआय दरवाढीबाबत तूर्त सावध भूमिका घेऊ शकते. बँकेकडून व्याजदरात कोणाताही बदल न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
RBI करणार इतर सेंट्रल बँकांचे अनुकरण
केवळ भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांना महागाईने त्रस्त केले आहे. विशेषत: रशिया आणि युक्रेन युद्धानंतर युरोपातील अनेक देशांत आणि अमेरिकेत महागाईने तेथील नागरिकांना मेटाकुटीला आणले आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक, युरोपीयन सेंट्रल बँक, इंग्लडमधील बँक ऑफ इंग्लड, आशियातील प्रमुख सेंट्रल बँकांनी मागील वर्षभरात कठोर पतधोरण राबवत व्याजदर वाढवले. मार्च महिन्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.25% वाढवला तर युरोपीयन सेंट्रल बँकेने व्याजदरात थेट 0.50% वाढ केली होती. जागतिक पातळीवरील सेंट्रल बँकांच्या धर्तीवर भारतात देखील रिझर्व्ह बँकेने पतधोरणाची दिशा ठेवली होती.येत्या पतधोरणात देखील जागतिक बँकांच्या व्याजदर वाढीची छाप दिसून येण्याची दाट शक्यता आहे.
महागाईचे आकडे काय सांगतात
महागाईबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे स्पष्ट धोरण आहे.किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा किमान 4% (+ किंवा -2%) इतका असावा. महागाईची सध्याची आकडेवारी पाहिली तर जानेवारी 2023 मध्ये ग्राहकमूल्यावर आधारित महागाई दर 6.52% इतका होता.फेब्रुवारी महिन्यात त्यात किंचित घसरण झाली.फेब्रुवारी 2023 मध्ये महागाई दर 6.44% इतका खाली आला. याच महिन्यातील अन्नधान्य महागाईचा दर 5.95% इतका आहे. रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टापेक्षा महागाई दर हा जवळपास 3% जास्तच आहे.