Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UDGAM Web Portal : दावा न केलेल्या ठेवींंचा एकाच ठिकाणी घ्या शोध; RBI कडून 'उद्गम' वेब पोर्टल सुरू

UDGAM

Image Source : www.rbi.org.in

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिल 2023 मध्ये विविध बँकामधील दावा न केलेल्या ठेवी (Unclaimed Deposits) शोधण्यासाठी एक केंद्रीकृत वेब पोर्टल विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आरबीआयकडून (RBI) गुरुवारी उद्गम (Udgam) हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून खातेदारांना आता एकाच ठिकाणी विविध बँकांमधील त्यांच्या दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेता येणार आहे.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिल 2023 मध्ये विविध बँकामधील दावा न केलेल्या ठेवी (Unclaimed Deposits) शोधण्यासाठी एक केंद्रीकृत वेब पोर्टल विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आरबीआयकडून गुरुवारी उद्गम (Udgam) हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून खातेदारांना आता एकाच ठिकाणी विविध बँकांमधील त्यांच्या दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेता येणार आहे. भारतात सार्वजनिक बँकांमध्ये सुमारे 35 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दावा न केलेल्या ठेवीमध्ये पडून आहे.

दावा न केलेल्या ठेवी म्हणजे काय? Unclaimed Deposits

कोणत्याही बँकेमध्ये खातेदार विविध योजनांतर्गत गुंतवणूक करतो अथवा, बँकेत बचत खाते उघडून त्यामध्ये रक्कम ठेवतो. मात्र, अशी कित्येक खाती आहेत जी अनेक वर्षापासून बंद आहेत. त्या खात्यासंदर्भात कोणाकडून काही विचारणा केली जात नाही. त्या खात्यामध्ये कोणतेही व्यवहार केले जात नाहीत. अशा प्रकारच्या बंद खात्यामधील ठेवींमधील रकमेचा आकडा हा हजारो कोटी रुपये आहे. ज्याच्यावर कोणत्याही खातेदाराकडून अथवा वारसाकडून अद्याप दावा करण्यात आलेला नाही.

दावा न करण्याची कारणे?

भारतातील विविध सरकारी, सहकारी, आणि खासगी बँकांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या ठेवी दावा न केल्याने पडून आहेत. या ठेवींवर दावा न करण्यामागे बरीच कारणे असेतात. काही वेळेस ठेवीदाराचा मृत्यू, वारसदारांना ठेवीबाबत माहिती नसते, बँकेला वारसदाराची माहिती न मिळणे, वारसदारांचा पत्ता बदलणे, खातेदाराशी संपर्क न होणे यासह इत्यादी अनेक बाबींमुळे अशा प्रकारच्या दावा न केलेल्या ठेवींमध्ये वाढ होत आहे. मात्र,आता अशा दावा न केलेल्या ठेवींची माहिती एकाच वेबपोर्टलवर उपलब्ध होत असल्याने वारसांना या ठेवींची माहिती सहज शोधता येणार आहे.

उद्गम पोर्टलमुळे एकाच ठिकाणी मिळणार माहिती UDAGM web Portal 

10 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी त्यांच्या लाभार्थ्यांना अनेक बँकांच्या वेब साइटवर जावे लागते. मात्र, आरबीआयने सुरु केलेल्या उद्गम (UDAGM web Portal)या वेब पोर्टलच्या माध्यमातून विविध बँकामधील दावा न केलेल्या त्यांच्या ठेवींचा शोध घेणे सोपे होणार आहे. या वेब पोर्टलद्वारे अनेक बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेता येईल. हे नवीन वेब पोर्टल बँक ग्राहकांना त्यांच्या दावा न केलेल्या ठेवी एकाच ठिकाणी शोधण्यात मदत करेल. UDGAM हे वेब पोर्टल रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (ReBIT), आणि इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (IFTAS) आणि इतर बँकांच्या सहयोगातून विकसित करण्यात आले आहे.

15 ऑक्टोबर पर्यंत सर्व माहिती उपलब्ध होईल

आरबीआयने सुरुवातीला उद्गम या वेबपोर्टलवर केवळ  7 बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींची माहिती उपलब्ध करून दिली आहे. यासह उर्वरित बँकांमधील ठेवींची माहिती 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत उपलब्ध करून दिली जाईल, असे आरबीआयने म्हटले आहे. ठेवींचा शोध घेण्यासाठी तुम्हाला उद्गम पोर्टलवर लॉगईन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खातेधारकाचे नाव आणि बँकेचे नाव भरण्यासाठी एक फॉर्म उलपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला दावा न केलेल्या ठेवी असल्यास सर्च पर्याय उपलब्ध होईल. तिथे तुम्ही तुमच्या दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेऊ शकता.