शेअर मार्केटमध्ये रेल्वे क्षेत्राशी संबधित शेअर्सनी मागील चार महिन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. रेल्वे क्षेत्रातील शेअर्सला किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून चांगली मागणी आहे. त्यातील टेक्समॅको रेल अॅंड इंजिनिअरिंग, ज्युपिटर वॅगन आणि टिटागढ रेलसिस्टम हे शेअर मागील चार महिन्यात मल्टीबॅगर बनले असून त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले.
एप्रिलपासून शेअर मार्केटमध्ये तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 11% ने वाढला आहे. याच काळात रेल्वे सेक्टर्समध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. सरकारकडून पायाभूत सेवा सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. याचा फायदा रेल्वे क्षेत्राला होण्याची शक्यता आहे.
रेल्वे क्षेत्रात सरकारकडून होणारी गुंतवणूक लक्षात घेता गुंतवणूकदारांसाठी रेल्वेचे शेअर्स पहिली पंसत ठरत असल्याचे स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे मुख्य संशोधक संतोष मीना यांनी सांगितले. ते म्हणाले की, या क्षेत्रातील कंपन्यांना मोठी कंत्राटे मिळाली आहेत. त्याशिवाय या क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. त्यामुळे या शेअरला फायदा होईल, असे मीना यांनी सांगितले.
शेअर मार्केटमधील आकडेवारीनुसार 1 एप्रिलपासून टेक्समॅको रेल अॅंड इंजिनिअरिंग हा शेअर 169% ने वाढला आहे. ज्युपिटर वॅगनचा शेअर 153% आणि टिटागढ रेलसिस्टमचा शेअर 149% वाढ झाली.
ओदिशामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर रेल्वे क्षेत्रात सुधारणांची गरज अधोरेखित झाली. सरकारकडून रेल्वेतील पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद शेअर्सवर उमटले आहेत. सरकारकडून टप्प्याटप्यात रेल्वे कोचेस बदलणे, माल वाहतुकीसाठी स्वतंत्र कॉरिडोअर उभारण्याचे काम सुरु आहे.
रेल्वे क्षेत्रातील इतर कंपन्यांचीही शेअर मार्केटमध्ये घोडदौड सुरु आहे. ज्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन 89%, रेल विकास निगम 81%, इरकॉन इंटरनॅशनल 78%, रेलटेल कॉर्पोरेशन 75%,ओरिएंटल रेल इन्फ्रा 60%, टेक्समाको इन्फ्रा अॅंड होल्डिंग 59%, बीसीपीएल रेल्वे इन्फ्रा 58% ने वधारले आहेत.