अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि  क्रेडिट स्वीस या दोन बड्या बँका आर्थिक संकटात आल्यानंतर जगभरातील वित्तीय सेवा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील तीन बँका एकामागोमाग एक आर्थिक संकटात सापडल्याने पुन्हा 2008 ची मंदी येणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी एक गर्भीत इशारा दिला आहे. जगभरातील बँकिग क्षेत्र कडेलोटाच्या उंबरठ्यावर असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ज्ञ राहिलेल्या राजन यांनी 2008 मधील जागतिक मंदीचे सुमारे दशकभर आधीच भाकीत केले होते. आताही राजन यांनी जागतिक पातळीवरील बँकिंग क्षेत्राबाबत महत्वाचे विधान केले आहे. राजन म्हणाले की बँकिंग क्षेत्रात सहजपणे उपलब्ध होणारी कर्जे आणि प्रचंड प्रमाणात असलेली रोकड मुबलकता या दोन गोष्टी भविष्यातील संकटास कारणीभूत ठरु शकतात. दिर्घकाळापासून अशीच परिस्थिती असल्याने बँकिंग क्षेत्र संकटाच्या उंबरठ्यावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्लास्गो येथे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी हा इशारा दिला. 
केंद्रीय बँकांमुळे बाजारात रोकड तरलता खूप वाढली आहे. मागील 10 वर्षांत रोकड तरलतेचे प्रमाण वाढल्याने पैसा सहज उपलब्ध होत आहे. यामुळे ग्राहकांना देखील याची सवय लागली आहे. मात्र यामुळे बँकिंग क्षेत्र आतून पोकळ बनले आहे. आता सेंट्रल बँकांनी पतधोरण कठोर करण्यास सुरुवात केल्याने याचे विपरित परिणाम बँकिंग क्षेत्रावर दिसून येतील. बँकांवरील संकट आणखी गडद होईल, असे राजन यांनी सांगितले.
रोकड तरलतेमुळे बँकांची स्थिती नाजूक बनली आहे. त्यातच महागाई रोखण्यासाठी मागील काही महिन्यांत जगभरातील सेंट्रल बँकांनी पतधोरण कठोर केले आहे. अनेकांनी व्याजदर वाढ करुन महागाई नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली.यामुळे आता बँकांची परिस्थिती अचडणीची बनत असल्याचे राजन यांनी सांगितले. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. अन्यथा बँकांसाठी नवी समस्या निर्माण होईल, असा इशारा राजन यांनी यावेळी दिला.
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक डबघाईला आल्यानंतरस्वित्झर्लंडमधील क्रेडिट स्वीस बँकेची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावल्याचे धक्कादायक माहिती समोर आली होती.   अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अचानक बंद झाली होती. त्यापाठोपाठ सिग्नेचर बँक देखील अमेरिकन बँकिंग रेग्युलेटरने तडकाफडकी बंद केली होती. यामुळे अमेरिकेतील बँकांना रोजचा व्यवसाय करणे मुश्किल झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील बँकांवरचे मंदीचे लोण आता युरोपात पसरले आहे. आर्थिक संकट वाढल्यानंतर फेडरल रिझर्व्ह आणि युरोपीय सेंट्रल बँक अलर्ट मोडवर आहेत. 
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            