Pune Rikshaw Strike: पुण्यातील रिक्षाचालकांनी शहरात सुरू असलेल्या बेकायदा बाईक आणि टॅक्सी सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांविरोधात चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. रिक्षाचालकांनी या विरोधात प्रशासनाला 14 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही प्रशासनाने त्यात लक्ष घातले नाही. परिणामी पुण्यातील रिक्षा चालक संघटनांनी सोमवारी चक्काजाम आंदोलन केले.
अॅपधारित सर्व्हिसमुळे रिक्षाचालकांच्या धंद्यात घट!
मोठमोठ्या शहरांमधून आपले बस्तान बांधणाऱ्या ओला-उबेरसारख्या अॅपधारित सर्व्हिसेसमुळे रिक्षाचालकांच्या धंद्यावर परिणाम होऊ लागला होता. या विरोधात रिक्षाचालकांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. यापूर्वीच रिक्षाचालक संघटनांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून अॅपधारित सेवा बंद करण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी रिक्षाचालकांची मागणी मान्य करत या सेवा बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रशासनाकडून याबाबत काहीच कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी प्रशासनाला 14 दिवसांचा इशारा दिला होता. त्यानुसार रिक्षचालक संघटनांनी आजपासून चक्काजाम आंदोलनाला सुरूवात केली.
पुण्यातील रिक्षा प्रवास 21 रुपयांवरून 25 रुपये!
4 महिन्यापूर्वीच पुण्यातील किमान रिक्षाभाडे 21 रुपयांवरून 25 रुपये झाले आहे. पूर्वी पहिल्या दीड किलोमीटरसाठी ग्राहकांना 21 रुपये द्यावे लागत होते. त्यात आरटीओने 4 रुपयांची वाढ करून पहिल्या दीड किलोमीटरसाठी 25 रुपये किमान भाडे केले. गेल्या 8 ते 10 महिन्यात पुण्यातील रिक्षाच्या भाड्यात 18 रुपयावरून 21 रुपये आणि त्यानंतर 21 रुपयांवरून 25 रुपये भाडे करण्यात आले.
पुण्यातील ट्रॅफिकच्या चर्चा वर्षानुवर्ष पुणेकर सांगत आले आहेत. पण यावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पुण्यात प्रत्येक घरात किमान 2 ते 3 वाहने असल्याचे एका सर्व्हेक्षणात दिसून आले होते. त्यात पुण्यातील रिक्षचालकांची संख्याही वाढत आहे. परिणामी ट्रॅफिकचा पुरता गोंधळ उडालेला असतो. यावर पुणेकरांना काही प्रमाणात रिलिफ मिळावा म्हणून काही अॅपधारित सर्व्हिस कंपन्यांनी बाईक सर्व्हिस सुरू केली. पण या बाईक सर्व्हिसला पुण्यातील रिक्षाचालकांनी विरोध दर्शवत ती बंद करण्याची मागणी केली. त्याचाच भाग म्हणून सोमवारी रिक्षाचालकांनी पुण्यातील आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले.