भारतीयांना परवडणाऱ्या दरात विमा आणि सुरक्षेचा लाभ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) या तीन विमा योजनांना आज 9 मे 2023 रोजी 8 वर्ष पूर्ण झाली. या तीनही योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 मे 2015 रोजीकोलकाता येथे झाला होता. मागील तीन वर्षात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 16 कोटी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 34 कोटी आणि अटल पेन्शन योजनेत 5 कोटी भारतीयांनी नोंदणी केली आहे.
या तीन सामाजिक सुरक्षा योजना नागरिकांचे कल्याण तसेच कोणतीही दुर्दैवी जोखीम, घटना किंवा आर्थिक अनिश्चिततेपासून मानवी जीवनाचे रक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश अधोरेखित करण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत. वंचित पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना आवश्यक आर्थिक सेवा उपलब्ध करून त्यांची आर्थिक जोखीम कमी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मागील आठ वर्षात पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय या दोन योजनांमधून एकूण 15900 कोटींचे दावे निकाली काढण्यात आले आहेत.
या तीन योजना नागरिकांचे कल्याण, मानवी आयुष्याचे कोणत्याही दुर्दैवी घटनेमध्ये तसेच आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षण करण्याची गरज यातून पूर्ण होणार आहे. देशाच्या असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना सरकारने आखल्या तर वृद्धावस्थेतील अनिश्चिततेपासून संरक्षण देण्यासाठी अटल निवृत्ती योजना आखली गेली.भारतीय नागरिकाला बॅंकेची सुविधा , आर्थिक साक्षरता तसेच सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध असावे या प्राथमिक हेतूने, 2014 साली आर्थिक समावेशकतेसाठी राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली. या संकल्पनेला पुढे नेत देशात आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वृद्धिंगत करण्यासाठीच सरकारने या तीन योजना राबवल्या असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
तीन योजनांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर 26 एप्रिल 20230पर्यंत 16.2 कोटी , 34.2 कोटी आणि 5.2 कोटी ग्राहकांची नावनोंदणी अनुक्रमे पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय आणि एपीवाय या योजनांमध्ये झाली आहे. पीएमजेजेबीवाय या योजनेविषयी अर्थमंत्री म्हणाल्या की यामुळे 6.64 लाख कुटुंबांना 13,290 कोटी रुपयांचे दावे प्राप्त झाले आहेत. पीएमएसबीवाय योजनेअंतर्गत 1.15 लाखांहून अधिक कुटुंबांना 2,302 कोटी रुपयांचे दावे प्राप्त झाले. सुलभ दावा प्रक्रियेमुळे वारसांना जलदगतीने योजनांचा लाभ मिळत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करत आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मोहीम सुरु केली असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.