सुतार, लोहार, चर्मकार यासारख्या कारागिरांची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेचा येत्या 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. “पीएम विश्वकर्मा” योजनेत पुढील 5 वर्षात 13000 कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
उत्तर भारतात 17 सप्टेंबर हा विश्वकर्मा दिन म्हणून साजरा केला होता. या निमित्ताने पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही 17 सप्टेंबर रोजी जन्मदिन आहे. शुभारंभावेळी देशभरातून 70 विविध ठिकाणांहून 70 मंत्री उपस्थित राहणार आहेत. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती.
पारंपरिक कलाकौशल्याचे काम करणाऱ्यांना लाभ देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. हस्त-कलाकार आणि कारागीरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना जागतिक मूल्य साखळीशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार लाभ
या योजनेतून कारागीरांची कौशल्य सुधारणे, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल. ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागीर या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. विणकर, सोनार, लोहार, लॉन्ड्री कामगार, नाभिक समाजातील कुटुंबांचे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरण केले जाणार आहे.
कारागीरांना मिळणार ते 1 ते 2 लाखांचे कर्ज
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, हस्त-कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाणार आहे. कारागीरांना पहिल्या टप्प्यात 1 लाखपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यासाठी 5% व्याज दर असेल. दुसऱ्या टप्प्यात 2 लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल.
पहिल्या टप्प्यात अठरा पगड जातींचा विकास
पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल: सुतार, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे कारागीर, लोहार, हातोडी आणि अवजार संच बनवणारे, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारे), पाथरवट, चर्मकार, गवंडी,बांबू साहित्य कारागीर (कांबाटी), बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, नाभिक, फुलांचे हार बनवणारे कारागीर,परीट (धोबी),शिंपी आणि मासेमारचे जाळे विणणारे कारागीर या समाजातील गरजूंना अर्थसहाय्य केले जाणार आहे.