'ये फेविकॉल का जोड है टुडेगा नही' हे जाहिरातीतील प्रसिद्ध वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. प्रत्येक घरात फेविकॉल किंवा फेविक्विकची ट्युब नक्कीच असेल. एखादी तुटलेली वस्तू जोडायची असेल तर नक्कीच या उत्पादनांची आठवण होते. हा ब्रँड घराघरात पोहचवला तो पिडिलाइट या कंपनीने. कोणी विचारही केला नसेल पिडिलाइट (Pedilite Industry) कंपनी एवढी मोठी होईल. पाहूया पिडिलाइट कंपनीने कसं बाजारात नाव कमावलं.
गुजरातमधल्या छोट्याशा गावातील बलवंत पारेख यांना वस्तू चिकटवण्यासाठी लागणाऱ्या अधेसिव्ह तयार करण्याची कल्पना सुचली. मात्र, त्याआधी त्यांनी अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यात नशीब आजमावून पाहिले. गुजरातमधून काहीतरी कामच्या शोधात ते मुंबईला आहे. तेथे आल्यावर त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र, स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छाशक्ती होती. ते ज्या ट्रेडर्सकडे काम करत होते त्याने बलवंत पारेख यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक व्यवसायही केले. डाइंग, पेपर डाइंग, प्रिंटिग प्रेस हे सुरू केलेले व्यवसाय त्यांनी काही दिवसांतच बंद केले.
अधेसिव्ह उद्योगाची कल्पना कशी सुचली?
पारेख यांनी जर्मन कंपनी फेडकोमध्ये काही दिवस काम केले. या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना अधेसिव्ह इंडस्ट्रीची माहिती मिळाली. तेव्हा त्यांना अधेसिव्ह उत्पादने बनवणारी कंपनी तयार करण्याची कल्पना सुचली. कारण, त्याकाळी प्राण्यांच्या चरबीला गरम पाण्यात उकळून फर्निचर किंवा औद्योगिक वापरातील वस्तू चिकटवण्यासाठी अधेसिव्ह तयार केले जात. मात्र, त्याला खूप उग्र वास होता आणि बनवण्याची प्रक्रियाही खूप किचकट होती. या उद्योगात इतर मोठी कंपनीही नसल्याने त्यांने त्यांना यात संधी दिसली. त्यांनी प्राण्याची चरबी न वापरता सिंथेटिक ग्लू वापरून फेविकॉल नावाचे उत्पादन बनवले. हे उत्पादन काही दिवसांतच प्रसिद्ध झाले. बाजारात याची मोठी मागणी वाढली. सुरुवातीला बलवंत पारेख यांनी त्यांच्या भावासोबत मिळून 1959 साली पिडीलाइट डायकेम इंडस्ट्री असे कंपनीचे नाव ठेवले होते. मात्र, त्यात नंतर बदल करत पिडिलाइट इंडस्ट्री असे नाव ठेवले.
डायरेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरली यशस्वी -
बलवंत पारेख यांनी बनवलेल्या फेविकॉल उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी डिलर किंवा ड्रिस्ट्रिब्युटरकडे जाणे टाळले. त्यांनी थेट फर्निचर निर्मिती करणाऱ्या दुकानदारांनाच लक्ष्य केले. फेविकॉल वापराचे फायदे त्यांना समजून सांगितले. त्यांच्या उत्पादनाचे सर्वात मोठे ग्राहक हे छोटे मोठे सुतार आणि फर्निचर बनवणाऱ्या कंपन्या होत्या. त्यामुळे थेट उत्पादनाच्या ग्राहकाकडे जाण्याची त्यांची रणनीती यशस्वी ठरली. सोबतच त्यांनी अधेसिव्ह मार्केटमध्ये असणाऱ्या इतर कंपन्याही विकत घेतल्या. जसे की, स्टील ग्रीप, एम-सील यासांरख्या कंपन्या विकत घेऊन त्यांनी या उद्योगातील स्पर्धाच संपवली.
युनिक जाहिरातीमुळे उत्पादन घराघरांत पोहचले
फक्त फर्निचर निर्मितीमध्येच नाही तर घरगूती वापरासाठीही अधेसिव्हची गरज भासते. घरातील एखादी वस्तू तुटली तर तिला चिकटवण्यासाठी कोणतेही चांगले उत्पादन बाजारात उपलब्ध नव्हते त्यामुळे त्यांनी फेविक्विक सारखे उत्पादन बाजारात आणले. फेविकॉल आणि फेविक्विक या उत्पादनांची क्रिएटिव्ह पद्धतीने जाहिरात केली. तुम्हालाही फेविकॉलच्या अनेक जाहिराती आठवत असतील. अशा क्रिएटिव्ह जाहिरातींमुळे पिडिलाइट ब्रँड घराघरात पोहचला.
२०२० साली कंपनीचे वार्षिक उत्पन्न सुमारे साडेसात कोटी रुपये एवढे होते. कंपनीमध्ये सहा हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असून मधुकर पारेख सध्या कंपनीचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. कंपनीचा २०२० सालातील निव्वळ नफा अकराशे कोटी इतका होता.