कष्ट करण्याची जिद्द असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. याची प्रचिती मूळचा युपीचा असलेल्या अलख पांडे या युवकाने करून दिली आहे. एडटेक प्लॅटफॉर्म (एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचा वापर) असलेल्या फिजिक्सवाला (PhysicsWallah) या कंपनीत वेस्टब्रिज आणि जीएसव्ही व्हेंचर्स (Westbridge and GSV Ventures) या गुंतवणूकदार कंपन्यांनी 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केल्याने फिजिक्सवाला या एडटेक कंपनीचे मूल्य 1.1 अब्ज झाले असून ती युनिकॉर्न (Unicorn Club) बनली आहे.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, हा निधी व्यवसाय विस्तारासाठी वापरला जाणार आहे. यातून आणखी सेंटर्स उभारली जाणार आहेत. व्यवसाय विस्ताराचा भाग म्हणून PhysicsWallah हे मराठी, बंगाली, हिंदी, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, तमिळ आणि तेलगू या स्थानिक भाषांमध्ये सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. फिजिक्सवालामध्ये सध्या 500 शिक्षक आणि 90 ते 100 तंत्रज्ञांसह 1,900 कर्मचारी आहेत. यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरे देण्यासाठी 200 सहयोगी प्राध्यापक आणि परीक्षेचे प्रश्न व पेपर तयार करण्यासाठी इतर 200 प्रोफेशनल व्यक्तींची मदत घेतली जाते.
युनिकॉर्न काय आहे?
उद्योग व भांडवली क्षेत्रात असा कोणताही व्यवसाय ज्याचं मार्केट कॅपिटल किंवा बाजार मूल्य हे 1 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होतं, तेव्हा त्या स्टार्टअपला युनिकॉर्न म्हटलं जातं. युनिकॉर्न हा शब्द सर्वात आधी काऊबॉय उद्योगाच्या संस्थापक मिसेस आयलीन ली यांनी तयार केला होता. त्यांनी अशा एकूण 39 स्टार्टअप्सचा उल्लेख करताना युनिकॉर्नचा उल्लेख केला होता, ज्याचं बाजार मूल्य 1 मिलियन डॉलरपेक्षा जास्त होते.
‘फिजिक्सवाला’चे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे यांनी, इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने आणि ब्रॅण्डवॅगनमध्ये सहभाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, पुढे ते म्हणाले की, सुरूवातीपासूनच आम्ही सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण सुरू राहावे, तसेच त्यांच्या करिअरमध्ये वाटचाल करत असताना कोणत्याही अडचणींशिवाय आर्थिकदृष्ट्या परवडण्यायोग्य आणि चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळावं, यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा नवीनतम विकास आम्हांला आमचा दृष्टीकोन पुढे नेण्यास आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रवासात वाढ करण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्यास मदत करेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठता येईल. यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 'फिजिक्सवाला’मध्ये खर्च होणारा प्रत्येक रूपया हा विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असेल, असे ते म्हणाले.
युट्यूबवरील प्रसिद्ध शिक्षक अलख पांडे आणि टेक एक्झिक्युटिव्ह प्रतीक महेश्वरी या दोघांनी मिळून 6 मिलियनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी उच्च प्रतिचं शैक्षणिक साहित्य निर्माण आणि वितरित केलं. शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळावी हे जीएसव्ही व्हेंचर्सचे ध्येय असून ते पूर्ण करण्यासाठी फिजिक्सवाला झटत आहे, असे जीएसव्ही व्हेंचर्सचे व्यवस्थापकीय भागीदार डेबोराह क्वाझो (GSV Ventures Managing Partner Deborah Quazzo) यांनी म्हटले.
2016 मध्ये अलखने यूट्यूब चॅनल सुरू केले. पहिल्या एका वर्षात या चॅनेलचे चार हजार सदस्य होते. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. आज या चॅनलचे 6.91 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.
image source - https://bit.ly/3H3KQnJ