पंढरपूर (Pandharpur) हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी या एकादशींना मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीत दाखल होतात. त्यातील आषाढी एकादशीला (Ashadhi wari) भरणाऱ्या यात्रेत प्रतिवर्षी सुमारे 43 पालख्यांसह 10 ते 15 लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. (वर्षभरात अंदाजे 3 कोटी भाविक पर्यटक पंढरपूरमध्ये येतात). या वारी काळात टाळ मृदगांच्या गजरात दुमदुमणाऱ्या पंढरीमध्ये कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरी समितीसह शहरातील प्रवासी वाहतूक, हॉटेल आणि खासगी निवास व्यवस्था, हार-फुले विक्री, प्रसाद विक्रेते, वाहन पार्किग, धार्मिक साहित्य खरेदी-विक्री, खाद्यपदार्थ विक्री, पर्यटन, आरोग्य सुविधा यांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात वधारलेले पाहायला मिळते. दरम्यान आषाढी वारीमुळे पंढरपुरातील लहान-मोठ्या व्यवसायांसह इतर कोणकोणत्या घटकांच्या अर्थकारणाला हातभार लागतो याबाबत आपण जाणून घेऊयात.
विठ्ठ्ल मंदिर समितीचे अर्थकारण- Economy of Vitthal Mandir committee
आषाढीवारी काळात (दशमी,एकादशी आणि द्वादशी) पंढरपुरात सुमारे 10 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. त्यामुळे या वारीकाळात मंदिर समितीला मिळणारे उत्पन्न हे कोटी रुपयांच्या घरात जाते. त्यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी चरणी मिळालेल दान (सोने-चांदी,रोख रक्कम) देणगी पावती, ऑनलाईन देणगी, हुंडी पेटीतील जमा रक्कम, महाप्रसाद (लाडू विक्री), राज्यभरातील मंदिर समिती आणि दिंड्यांकडून मिळणारी देणगी, यासह मंदिर समितीच्या भक्त निवासाच्या उत्पन्नाचा समावेश असतो. मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये 1200 भाविक मुक्काम करू शकतात. यासाठी 1000 ते 1500 रुपये दर आकारले जातात. यासर्व माध्यामातून फक्त आषाढीवारी काळात मंदिर समितीला सुमारे 9 ते 10 कोटींचे (आकडेवारी मागील यात्रा काळातील उत्पन्नाच्या आधारे काढली आहे, यामध्ये बद्ल होऊ शकतो) उत्पन्न मिळते.
पंढरपूर शहराचे अर्थकारण- Economy of Pandharpur
आषाढी वारी काळात पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेमधील लहान-मोठे व्यवसाय हे प्रमुख स्त्रोत आहेत. वारीकाळात अंदाजे 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. त्यामुळे या काळात इथल्या अर्थकारणाला मोठी चालना मिळते. इथे येणारा प्रत्येक वारकरी सरासरी 300 ते 400 रुपये खर्च करतो. त्यामध्ये कपाळावर चंदनाचा टिळा, केशरी गंध लावण्यापासून ते पांडुरंगाच्या चरणावर दान टाकण्यापर्यंतच्या पैशांचा समावेश करता येईल. आषाढी वारी काळात पंढरपूर शहरामध्ये जवळपास 60 ते 70 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यामध्ये व्यवसायामध्ये हार फुल विक्रेते, प्रसाद विक्रेते, टाळ-मृदंग, भजन साहित्य, तुळशीच्या माळा, कुंकू अष्टगंध बुक्का विक्रिते, फोटो, दगडी मूर्ती विक्री, त्याचबरोबर घोडागाडी, रिक्षा, नावेतून जलप्रवास, पैसे घेऊन हजारो वारकऱ्यांना निवासाची सोय, दूध, फराळाचे पदार्थ विक्री, मंडप, राहुट्याचे साहित्य भाड्याने देणे, पिण्याचे पाणी, चंद्रभागे तीरावर दिवाबत्ती यासारख्या कित्येक व्यावसायिक घटकांचा यामध्ये समावेश होतो.
पंढरपुरातील महत्त्वाचे व्यवसाय-
तुळशी हार-फुले विक्रिते-
आषाढी वारी काळात तुळशी हार फुले यांना मोठ्या प्रमाणात मागणी होते. पंढरपुरात यासाठी फुलांच्या बाजारपेठेत नियमित लिलाव केले जातात. त्यानंतर छोटे मोठे हार विक्रेते हार तयार करून त्याची विक्री करतात. यामध्ये तुळशीच्या मंजुळांचा हार, गुलाबांच्या फुलांचे हार, काकडा, लिली. झेंडू, इत्यादी फुलांच्या हाराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वारी काळात पंढरपुरात 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतचे हार उपलब्ध होतात. फक्त आषाढीवारी काळात फुल व्यावसायिकांची एकूण आर्थिक उलाढाल ही जवळपास 25 लाख रुपये होत असल्याची माहिती तेथील व्यापाऱ्यांनी दिली.
पेढे-प्रसाद विक्रेते-
पंढरपूरला येणारा प्रत्येक भाविक इथे आल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय माघारी जात नाही. या ठिकाणी प्रसाद म्हणून चिरमुरे, साखरेच्या रेवड्या, यासह पेढ्याच्या प्रसादाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे आषाढीवारी काळात प्रसाद विक्रीचा व्यवसाय तेजीत चालतो.यामध्ये केवळ पेंढ्याचा विचार केला तर साधारणात: 150 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत प्रति किलो या दराने पेढ्यांची विक्री केली जाते. आषाढीवारी काळात जवळपास 50 लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल फक्त प्रसाद विक्रीतून होत असते.
अंतर्गत प्रवासी वाहतूक सुविधा-
आषाढी काळात आलेले अनेक भाविक तीर्थाटन करत असतात. पंढरपुरात जवळपास 1200 मठ आहेत. या वारीकाळात अनेक गावचे भाविक आपआपल्या दिंडीच्या माध्यमातून मठात मुक्कामी जातात. त्याच बरोबर आसपासच्या तीर्थस्थळांना भेटी देतात. त्यामुळे पंढरपुरात प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून देखील वारी काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. यामध्ये रिक्षा, कार, टांगा, जलप्रवास यांचा समावेश होतो. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गोपाळपूर, विविध संतांचे मठ या ठिकाणी जाण्यासाठी अंतर्गत प्रवासी वाहनांचा उपयोग केला जातो. यामध्ये घोडागाडीसाठी किमान 30 आणि कमाल 100 रुपये, जलप्रवासासाठी 50 ते 100 रुपये दर आकारले जातात. रिक्षा अथवा इतर प्रवासी वाहनांचे दर प्रवासाच्या अंतरावर ठरलेले असतात. दरम्यान, या वारीकाळात एकूण अंतर्गत प्रवासी वाहतुकीच्या सुविधेतून माध्यमातून जवळपास 12 लाखाचे अर्थ चक्र फिरते राहते.
वारकरी निवासस्थाने-
आषाढी वारीकाळात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिंड्या, पालख्या आपआपल्या मठात निवाऱ्याची व्यवस्था करतात. जवळपास 17 लाख भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने भक्त निवास, हॉटेल, राहुट्या या सर्वच वारकऱ्यांची राहण्याची सोय होऊ शकत नाही. अशा वेळी ज्या वारकऱ्यांना पंढरपुरात राहण्याची आवश्यकता भासते त्यांच्यासाठी स्थानिक नागरिक पैस घेऊन खासगी निवासाची सोय उपलब्ध करून देतात. साधारण: प्रतिव्यक्ती 200 रुपये याप्रमाणे हा दर आकारला जातो. एका खोलीत किमान 5 ते 7 वारकऱ्यांना घर , गोदामे या ठिकाणी आसरा दिला जातो. या माध्यमातून देखील वारीकाळात पंढरपुरातील अर्थकारणाला चालना मिळते. या माध्यमातून तीन दिवसात पंढरपुरात जवळपास 50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होते.
तुळशीच्या माळा
आषाढी वारी काळात तुळशी माळेला देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. पंढरपुरात काशी कापडी समाजाचे व्यावसायिक तुळीच्या माळा तयार करून विक्री करतात. कमीत कमी 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत तुळशीची माळेची खरेदी विक्री केली जाते. या माध्यमातून जवळपास आषाढीवारी काळामध्ये 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत तुळशी माळांची आर्थिक उलाढाल केली जाते.
भजन, पूजा अर्चा साहित्य विक्री-
आषाढी वारीकाळात अनेक वारकरी भजनाचे साहित्य खरेदी करतात. त्यामध्ये टाळ, मृदंग, विना, ध्वनिक्षेपक याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. तसेच कंकू, बुक्का, अष्टगंध, लाखेचे चुडे,बांगड्या, लाकडी देवघर इत्यादी साहित्यादेखील मोठी मागणी असते या माध्यमामातून पंढरपूरच्या अर्थकारणात अंदाजे 22 ते 25 लाखांची भर पडते.
फोटो, पितळी आणि दगडी मूर्ती, तुळशी वृंदावन-
वारी काळात पंढरपुरामध्ये पितळेच्या विठ्ठल रुक्मिणी अथवा इतर देव देवतांच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी राहते. याच बरोबर पंढरपुरात दगडी मुर्त्या बनवण्याचे कारखाने देखील आहेत. अनेक भाविक लहान मोठ्या दगडी मूर्तींची देखील खरेदी करतात. 4000 पासून 1 लाख रुपयांपर्यंत दगडी मूर्ती, तसेच तुळशी वृंदावन याची विक्री होते. पितळेचा दर सध्या 1300 रुपये किलोच्या आसपास असेल, तरीही वारकऱ्यांकडून पितळेच्या देवतांच्या मूर्ती खरेदी करण्याकडे कल दिसून येतो. थोडक्यात देवी देवतांच्या मूर्ती, फोटो, तुळशी वृंदावन, इत्यादी माध्यमातून आषाढी काळात जवळपास 70 ते 80 लाखांपर्यंतची आर्थिक भर पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेत पडते.
उपरोक्त प्रमुख व्यवसाया व्यतिरिक्त पंढरपुरात असंख्य व्यवसाय आहेत, ज्यांचा आषाढी वारी काळात मोठ्या प्रमाणात पंढरपूरच्या अर्थकारणाला हातभार लागतात. थोडक्यात आपण प्रति वारकरी सरासरी 300 ते 400 रुपये खर्च अपेक्षित धरला तरीही पंढरपूरच्या आर्थिक उलाढालीचा अंदाज आपल्याला येऊन जातो.