टोमॅटोच्या किंमतींनी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर कांद्याचे भाव देखील वाढत आहे.टोमॅटोप्रमाणे कांद्याच्या किंमतींचा भडका रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच उपाययोजना सुरु केल्या आहेत. सरकारने राखीव साठ्यातील 3 लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यामुळे कांद्याचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असून भाववाढ नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी नुकताच नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाच्या (NCCF) व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कांद्याची विक्री करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली.
सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा दर प्रती किलो 30 ते 35 रुपये या दरम्यान आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कांद्याचा भाव 50 रुपयांपर्यंत वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती या देशपातळीवरील किमतींच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत अशी राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी सरकारकडून रब्बी कांदे खरेदी करून बफर साठा निर्माण केला जातो. या कांद्याची मागणी वाढण्याच्या काळात मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये पाठवला जातो. काही ठिकाणी ई-ऑक्शनच्या माध्यमातून कांद्याची विक्री करणे तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून कांद्याची किरकोळ विक्री करण्याचे ठरवण्यात आले. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बाजारांमधल्या विक्री व्यतिरिक्त, राज्यांना त्यांच्या ग्राहक सहकारी संस्था आणि महामंडळांच्या विक्री केंद्रांमधून कांद्याची विक्री करता यावी यासाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
चालू वर्षात सरकारने राखीव साठ्यातील एकूण 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जून आणि जुलै महिन्यामध्ये प्रत्येकी 1.50 लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदी केला होता. सुमारे 1000 मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली आणि हा कांदा नियंत्रित तापमानात गोदामात साठवण्यात आला आहे .
कांद्याची राखीव साठ्याची क्षमता वाढली
गेल्या चार वर्षांत कांद्याच्या बफर साठ्याच्या क्षमतेत तिपटीने वाढ झाली असून वर्ष 2020-21 मध्ये 1 लाख मेट्रिक टन एवढा साठा असलेला कांदा वर्ष 2023-24 मध्ये 3 लाख मेट्रिक टन एवढा झालेला आहे. कांद्याच्या या बफर साठ्याने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता निश्चित करण्यात येते. कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यात राखीव साठ्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.