Mahadev app Fraud: महादेव बेटिंग अॅप आणि त्याच्या मालकांच्या मागे सक्तवसुली संचलनालय (इडी) हात धुवून मागे लागली आहे. ऑनलाइन बेटिंगच्या माध्यमांतून मनी लाँड्रिंग केल्याचे समोर आल्यानंतर चौकशी सुरू आहे. छत्तीसगडमध्ये एकेकाळी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांचे ज्यूस सेंटर आणि टायर विक्रीचं दुकान होतं, जुगाराच्या व्यवसायानं त्यांचं नशीब पालटून टाकलं. मात्र, त्यांनी केलेले असंख्य घोटाळे, ब्लॅक मनीचे व्यवहार आता पुढे येत आहेत.
दरमहा 200 कोटी रुपयांची कमाई
महादेव बेटिंग अॅपद्वारे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल दरमहा 200 कोटी रुपये कमावत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. महादेव अॅप हे ऑनलाइन जुगार खेळण्याचे अॅप आहे. याद्वारे भारतासह इतरही देशातील नागरिक जुगार खेळायचे. यातून मिळालेला पैसा मनी लाँड्रिंग द्वारे ट्रान्सफर केला जायचा. तसेच गैरव्यवहार लपवण्यासाठी रोखीने व्यवहार केले जायचे.
लग्नसमारंभातील खर्च तपास यंत्रणांच्या डोळ्यावर
काही महिन्यांपूर्वी सौरभ चंद्राकरचा दुबईत विवाह सोहळा पार पडला. यासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे सर्व व्यवहार रोखीने झाले. तसेच टायगर श्रॉफ, सनी लियोनी, नेहा कक्करसह अनेक सेलिब्रिटिंनी या लग्नाला हजेरी लावली होती. त्यानंतर भारतातील तपास यंत्रणांना जाग आली. महादेव बेटिंग अॅपचे सर्व व्यवहार तपासण्यास सुरुवात केल्यानंतर गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग होत असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघेही फरार झाले.
दुबईतून पाहिले जाते काम
छत्तीसगडमधील भिलाई येथे सौरभ चंद्राकर याचे ज्यूस शॉप आणि आणि रवी उप्पल गाड्यांचे टायर विक्रीचे दुकान चालवत होता. दोघांनाही जुगाराचे व्यसन होते. दोघेही दुबईला फिरायला गेले होते. तेथे त्यांची काही लोकांशी ओळख झाली. त्यातून बेटिंग अॅप सुरू करण्याची कल्पना त्यांना सुचली.
दुबईतूनच त्यांनी महादेव बेटिंग अॅपचे काम सुरू केले. नव्या लोकांना जुगाराच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी विविध क्लृप्त्या वापरल्या. बनावट बँक खात्यांद्वारे त्यांनी जुगारातून मिळालेल्या पैशांचे व्यवहार केले. भारतभर जुगाराचे काम पाहण्यासाठी त्यांनी चार ते पाच हजार ऑपरेटर्स नेमले होते. त्यांच्याद्वारे नव्या लोकांचे खाते खोलून जुगार खेळला जायचा.
या दोघांनी महादेव बेटिंग अॅपद्वारे 5 हजार कोटी रुपये कमावल्याचा अंदाज सक्तवसुली संचलनालयाला आहे. तपास यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधीत सर्व खाती गोठवली असून मालमत्ता जप्त केली आहे. तसेच दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे.