• 04 Oct, 2022 00:28

ऑफिसर्स चॉईस व्हिस्की बनवणाऱ्या कंपनीकडून 2 हजार कोटींचा IPO दाखल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!

officers choice ipo

ही कंपनी व्हिस्की व्यतिरिक्त, रम आणि व्होडका देखील तयार करते. याशिवाय, कंपनी ऑफिसर्स चॉईस, ऑफिसर्स चॉईस ब्लू आणि स्टर्लिंग रिझर्व्ह या ब्रॅण्डने बाटलीबंद पाणी विकते.

ऑफिसर्स चॉईस व्हिस्की (Officer’s Choice Whisky) बनवणाऱ्या अलाईड ब्लेंडर्सने (Allied Blenders) 2,000 कोटी रुपयांच्या आयपीओ (IPO)साठी सेबीकडे (SEBI) अर्ज दाखल केला आहे. या आयपीओमध्ये 1 हजार कोटी रूपयांचा फ्रेश इश्यू असणार आहे. त्याचबरोबर यात 1 हजार रूपयांचा ऑफर फॉर सेल पण असणार आहे. यातील ऑफर फॉर सेलद्वारे कंपनी प्रमोटर आणि भागधारक आपला हिस्सा विकणार आहे.

आयपीओसाठी जमा केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (Draft Red Herring Prospectus -DRHP) मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओच्या ऑफर फॉर सेल अंतर्गत बिना किशोर छाब्रिया या 500 कोटी रूपयांचे शेअर विकणार आहेत. तर रेशम छाब्रिया जितेंद्र हेमदेव यांच्याकडून 250 कोटी रूपयांचे शेअर विकले जाणार. याचबरोबर निशा किशोर छाब्रिया यापण 250 कोटी रूपयांचे शेअर विकणार आहेत.

बिना छाब्रिया यांची या कंपनीमध्ये 52.20 टक्के भागीदारी आहे. तर रेशम यांच्याकडे 24.05 टक्के आणि निशा यांच्याकडे 19.96 टक्के भागीदारी आहे. या आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग कंपनीवरील कर्ज फेडण्यासाठी केला जाणार आहे. कंपनीवर डिसेंबर, 2021 मध्ये एकूण 926.89 कोटी रूपयांचे कर्ज होते.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities), अक्सिस कॅपिटल (Axis Capital), जेएम फायनान्शिअल (JM Financial), कोटक महिंद्रा कॅपिटल (Kotak Mahindra Capital) आणि इक्यूरस कॅपिटल (Equirus Capital) या कंपन्या या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. अलाईड ब्लेण्डर्स अण्ड डिस्टिलर्स (Allied Blenders & Distillers) ही भारतातील तिसरी सर्वांत मोठी भारतीय बनावटीची विदेशी दारू (Indian Made Foreign Liquor-IMFL) बनवणारी कंपनी आहे. 

ऑफिसर्स चॉईस व्हिस्की हा या कंपनीचा फ्लॅगशीप ब्रॅण्ड आहे. जो जगभरात सर्वांत जास्त विकल्या जाणाऱ्या ब्रॅण्डपैकी एक आहे. मार्च, 2022 पर्यंत कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 10 मोठे इंडियन मेड फॉरेन लिकर (IMFL) ब्रॅण्ड सहभागी होते. ही कंपनी व्हिस्कीसोबतच रम आणि व्होडका यांची निर्मिती सुद्धा करते. याचबरोबर कंपनी ऑफिसर्स चॉईस, ऑफिसर्स चॉईस ब्ल्यू आणि स्टर्लिंग रिझर्व्ह ब्रॅण्डच्या नावाने बाटलीबंद पाणी (Packaged Water) सुद्ध विकते.

अलाईड ब्लेण्डर्स 29 देशांमध्ये व्हिस्की, रम, ब्रॅण्डी आणि व्होडका यांची विक्री करते. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे 9 बॉटलिंग युनिट्स, एक डिस्टिलिंग सुविधा आणि 20 हून अधिक आऊटसोर्स मॅन्युफॅक्चरिंग साईट्स आहेत.

image source - https://bit.ly/3AakPBG