नॅशनल पेन्शन सिस्टिम अर्थात एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये लवकरच बदल केले जाण्याची शक्यता आहे. पेन्शनधारकाला आता एकरकमी पैसै काढण्याऐवजी ते ठराविक अंतराने काढण्याची सुविधा देण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे.
सध्याच्या नियमावलीनुसार वयाची 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदाला एनपीएस खात्यात जमा झालेल्या एकूण निधीपैकी 60% निधी काढण्याची परवानगी आहे. मात्र पेन्शन फंडांचे व्यवस्थापन करणाऱ्या पेन्शन फंड रेग्युलेटर अॅंड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने (PFRDA) पैसे काढण्याची सुविधा सभासदाच्या दृष्टीने आणखी सुटसुटीत करण्याचे संकेत दिले आहेत.
वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकरकमी 60% निधी काढण्याऐवजी त्याला वयाच्या 75 वर्षांपर्यंत ठराविक अंतराने पैसे काढण्याची सुविधा देण्याचा विचार 'पीएफआरडीए' करत आहे. यासंदर्भात 'पीएफआरडीए'चे अध्यक्ष दिपक मोहंती यांनी सूतोवाच केले. या तिमाही अखेर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
'पीएफआरडीए'ने एनपीएसमधूल पैसे काढण्याची नियमावली बदलली तर सभासदाला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला किंवा तिमाही स्तरावर, सहामाही आणि वार्षिक अशा ठराविक टप्प्यात पैसे काढण्याची सुविधा मिळेल. यामुळे एनपीएस सभासदाच्या हाती नियमित पैसे येत राहतील. त्याची दरमहा पैशांची चिंता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे मोहंती यांनी सांगितले.
टियर-1 आणि टियर-2 एनपीएस खातेधारकांना हे सुविधा उपलब्ध केली जाईल. ज्यात मंडळाकडून असाही एक विचार केला जात आहे की हा पर्याय एनपीएस सभासदाला 60 पूर्ण होण्याच्या आधी निवडता येईल, असे मोहंती यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
'एनपीएस' गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यातून बाहेर पडताना सभासदाला दोन पर्याय असतील. एक सिस्टेमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन अर्थात ठराविक अंतराने पैसे काढण्याची सुविधा आणि दुसरा पर्याय अर्थात सिस्टेमॅटिक लमसम विथड्रॉव्हल, पैसे काढण्याची प्रक्रिया पुढे ढकलणे किंवा योजना पुढे नियमित चालू ठेवणे असा आहे.
'एनपीएस'मधून पैसे काढण्याचा सध्याचा नियम काय?
- सध्याच्या नियमावलीनुसार वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर एनपीएसमधील एकूण निधीच्या 60% निधी काढण्यास परवानगी आहे.
- उर्वरित 40% निधी हा अॅन्युटी खरेदीसाठी वापरला जातो.
- वयाच्या 75 वर्षांपर्यंत पैसे काढण्याचा निर्णय पुढे ढकलण्याचा पर्याय आहे.
- या पर्यायात एनपीएस सभासदाला वर्षाला पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते.
- मात्र यासाठी दरवर्षी सभासदाला अर्ज करावा लागेल.