कोविडच्या काळात खऱ्या अर्थानं ओटीटीची (Over the top) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्याआधी ओटीटी प्लॅटफॉर्म कमी प्रमाणात वापरलं जायचंय. कोविडमध्ये लोक घरी होते. घराबाहेर पडण्याचं, मनोरंजनाचं साधन नव्हतं. अशावेळी नेटफ्लिक्स (Netflix), प्राइम व्हिडिओ (Prime video) यासह विविध ओटीटी प्लॅटफॉर्मनं लोकांच्या मनोरंजनाची व्यवस्था केली होती. कोविड काळ आणि लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा सर्व थिएटर्स, मॉल्स उघडण्यात आली तेव्हा त्याठिकाणी पहिल्याप्रमाणे गर्दी दिसली नाही. हाच ट्रेंड आतादेखील पाहायला मिळत आहे. लोक थिएटर्सकडे जाण्याऐवजी ओटीटी पसंत करत आहेत. टीव्ही 9नं याविषयी वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
जागा होतेय कमी
ओटीटीमुळे थिएटर्सकडे लोक फिरकत नाहीत. मात्र दुसरीकडे मॉल्सचंही टेन्शन वेगळंच आहे. अनेकठिकाणी मॉल्सना अटॅच थिएटर्स असतात. मात्र थिएटर्समध्येच लोक येत नाहीत. त्यामुळे मॉलचालकांच्या व्यवसायावर थेट परिणाम होताना दिसतोय. उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी तर आता मॉल्स डेव्हलपर्स मॉल्समधल्या चित्रपटगृहांना दिलेली जागादेखील कमी करत आहेत.
मॉल्सना थिएटर्सकडून किमान उत्पन्नाची हमी
मॉल्समध्ये चालणारे थिएटर ऑपरेटर शॉपिंग मॉल्स चालवणाऱ्या कंपन्यांसोबत महसूल वाटणीचे करार (Revenue sharing agreement) करतात. अशा करारामध्ये मॉल ऑपरेटरला चित्रपटगृह कंपनीकडून किमान भाडे उत्पन्नाची हमी मिळत असते. त्याचबरोबर थिएटर कंपन्यांच्या कमाईतली वाटणीही मिळत असते. मात्र असे करार झालेले असले तरी थिएटर्समध्ये लोकांची गर्दीच होत नसेल तर थिएटर्सना उत्पन्न तरी कसं मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यांची कमाई अपेक्षित होत नाही. दुसरीकडे थिएटरचं नुकसान होत असेल तर ते ज्या मॉलमध्ये आहे, त्यावरही याचा विपरित परिणाम होताना पाहायला मिळत आहे.
कोविडनंतर बिघडलं गणित
उत्पन्नाचं गणित बिघडलं ते कोविड आणि त्यानंतरच्या काळात. चित्रपटगृह चालकांच्या कंपन्या आता स्क्रीन्स कमी करताना दिसत आहेत. पीव्हीआर-आयनॉक्स मूव्ही थिएटर्स चालवणारी देशातली एक आघाडीची कंपनी आहे. त्यांच्या मते, कोविडच्या आधी म्हणजेच साधारणपणे 2019-20 या आर्थिक वर्षात चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्यांची संख्या 1.68 कोटी होती. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23मध्ये ती संख्या 1.4 कोटींवर आली आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न कसा करायचा यावर विचार सुरू आहे. मात्र आणखी नुकसान होऊ नये याकरिता पीव्हीआर आयनॉक्सनं येत्या 6 महिन्यात 50 स्क्रीन्स बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.
जुलैनंतर परिस्थिती बदलेल?
मूव्ही थिएटर्सची ऑक्युपेंसी कमी होत असल्याच्या कारणामुळे या कंपन्यांचं उत्पन्न त्या स्तरावर पोहोचत नाही, ज्यामुळे त्यांना मॉल्सबरोबर महसूल वाटून घेता येईल. त्यामुळे मॉल्सना फक्त हमीभावाचं किमान भाडं मिळतंय. आता पुढच्या 1-2 महिन्याच्या परिस्थितीवर थिएटर्सचालक आशादायी आहेत. जुलैनंतर एकामागोमाग एक सिनेमे रिलीज झाले की उत्पन्नात सुधारणा होईल, अशी थिएटर्सना आशा आहे.
तीन महिन्यांत थिएटर्सची ऑक्युपेंसी 27 टक्के
या प्रकरणावर युनिटी ग्रुपचे सह-संस्थापक हर्ष व्ही. बन्सल यांनी माहिती दिलीय. ते म्हणतात, की मागच्या तीन महिन्यांत थिएटर्सची ऑक्युपेंसी 27 टक्के राहिलीय. या वर्षी मे महिन्यापर्यंत ती 40 टक्क्यांवर पोहोचलीय. 40 टक्क्यांपर्यंतच्या ऑक्युपेंसीवर आम्ही रेव्हेन्यू शेअरिंग करू शकू.