सध्या आर्थिक फसवणुकीचे एकापेक्षा एक फंडे सायबर चोर घेऊन येत आहेत. सामान्य नागरिकांना फोन कॉल करून ओटीपी मागणाऱ्या सायबर चोरांबद्दल तुम्ही ऐकलं तर असेल परंतु आता या चोरांनी त्यापुढे एक पाऊल पुढे जात नवा मार्ग शोधलाय.
अशा फसवणुकीच्या प्रकारात नागरिकांना मिस्ड कॉल येत नाही, ओटीपी देखील जात नाही मात्र बँक खात्यातून पैसे मात्र लंपास केले जातात. या प्रकारच्या फसवणुकीचा छडा लावल्यानंतर पोलिसांना एक आश्चर्यजनक बाब समजून आली आहे. हे प्रकरण आहे सिम स्वॅपचे! चला तर जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण!
सिम स्वॅप स्कॅम
आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सगळेच आपल्या मोबाईलमध्ये बँकांचे आणि इतर आर्थिक व्यवहारांचे ॲप ठेवत असतो. आपलं काम सोपं व्हावं आणि घरबसल्या आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी आपण हे ॲप वापरतो. याचाच फायदा आता काही सायबर चोर घेताना दिसत आहेत.
सायबर चोर नागरिकांचे आधार आणि पॅन कार्ड जमा करतात, नंतर ते वापरत असलेल्या मोबाईल कंपनीशी संपर्क साधतात आणि त्यांचे सिम कार्ड खराब झाल्याचा दावा करतात आणि डुप्लिकेट सिम मिळवतात. आपल्या आधार कार्डावर आपली जन्मतारीख, राहत्या घराचा पत्ता आदी सर्व डीटेल्स असतात. या सगळ्यांचा वापर करून सिम कार्ड कंपनीकडून डुप्लिकेट सिम कार्ड मागवतात. एकदा की सायबर चोरांनी डुप्लिकेट सिम कार्ड घेतले की ते आपल्या नावे आर्थिक गैरव्यवहार करायला मोकळे होतात.
आता सायबर चोरांकडे डुप्लिकेट सिम असल्यामुळे ऑनलाइन बँकिंग करणे त्यांच्यासाठी सहजसोपे होऊन बसते. सायबर चोरांना थेट OTP जात असल्यामुळे बँक खातेदाराला त्याच्या बँकेतून नेमके कुठले व्यवहार होत आहेत याचा थांगपत्ता लागत नाही.
अलीकडेच या सिम स्वॅप स्कॅममुळे दिल्लीतील एका व्यावसायिकाचे 50 लाखांचे नुकसान झाले आहे, तर कोलकाता येथील आणखी एका व्यक्तीचे 72 लाखांचे नुकसान झाले आहे.
सिम स्वॅप स्कॅमपासून कसे वाचाल?
एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आधारकार्डच्या आधारेच तुम्हांला सिम कार्ड मिळते. त्यामुळे कुणालाही आधार कार्डची झेरॉक्स देऊ नका. जिथे कुणाला तुम्ही तुमची कागदपत्रे सादर करत असाल तिथे झेरॉक्सवर कागदपत्र सादर करण्याचे ‘कारण’ नमूद करायला विसरू नका. म्हणजे भविष्यात आधारकार्डच्या झेरॉक्सचा गैरवापर टाळता येऊ शकतो.
तसेच तुमच्या सिम कार्डसाठी पासवर्ड किंवा पिन सेट करा आणि तो नियमितपणे बदलत राहा. तुमचे सिम कार्ड कुठेही सोडू नका किंवा फेकू नका. तुम्हांला कोणतेही संशयास्पद संदेश किंवा अनोळखी नंबरवरून आलेले कॉल गांभीर्याने घ्या. अशा अनोळखी व्यक्तींशी कुठलेही व्यवहार करू नका आणि तुमची खासगी माहिती शेयर करू नका.
तसेच बँकिंग व्यवहारांसाठी, Google Authenticator या सॉफ्टवेअरचा वापर करा. हे सॉफ्टवेअर दर 30 सेकंदांनी तुमचा OTP बदलतो आणि तुमच्या आर्थिक व्यवहारांना सुरक्षा प्रदान करतो. यामुळे स्कॅमरला तुमचा OTP मिळवणे अत्यंत कठीण होते.
सतर्क राहणे हा या सिम स्वॅप फसवणुकीवर मात करण्याचा एकमेव मार्ग आहे हे लक्षात घ्या. जर तुम्ही या फसवणुकीचे बळी असाल तर तुमच्या बँकेशी लागलीच संपर्क साधा आणि RBI कडे तक्रार करा.