स्थावर मालमत्ता क्षेत्रातला रिटेल स्पेसमधील भारतातील पहिला आरईआयटी आयपीओ नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने आणला आहे.यातून कंपनी 3200 कोटी उभारणार आहे. यात प्रती शेअर 95 ते 100 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 11 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआयटी आयपीओ 9 मे 2023 रोजी खुला झाला होता. दोन दिवसांत हा आयपीओ एकूण 66% सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या आयपीओकडे क्यूआयबी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. क्यूआयबीसाठीचा राखीव कोटा केवळ 0.17% भरला आहे. इतर गुंतवणूकदारांसाठीचा राखीव कोटा 1.25 पटीने सबस्क्राईब झाला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना किमान 150 शेअर्सच्या लॉटसाठी अर्ज करता येणार आहे.
दरम्यान,नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने 16 अॅंकर गुंतवणूकदारांकडून 1439.99 कोटींचा निधी उभारला आहे. अॅंकर गुंतवणूकदारांना 100 रुपये प्रती शेअर या दराने शेअर वाटप करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. यात एचडीएफसी म्युच्युअल फंडांने सर्वाधिक 280 कोटींची गुंतवणूक केली आहे. तसेच आयआयएफएल एएमसीने 150 कोटींची गुंतवणूक केली आहे. आयसीआयसीआय प्रु. म्युच्युअल फंडाने 100 कोटी आणि एसबीआय म्युच्युअल फंडाने 100 कोटींची गुंतवणूक केली आहे.
नेक्सस सिलेक्ट ट्रस्टकडे देशातील 14 शहरांमध्ये 17 मॉल्स आहेत. त्याशिवाय दोन हॉटेल्स आणि तीन ऑफिस मालमत्ता आहेत. हॉटेल्समध्ये एकूण 354 रुम्स आहेत. यातून कंपनीला दरमहा भाडे मिळते. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैद्राबाद या शहरांमध्ये मोक्याच्या जागी कंपनीच्या या कमर्शिअल प्रॉपर्टी आहेत.दिल्लीतील सिटी मॉलमध्ये अॅपलचे स्टोअर सुरु करण्यात आले आहे. यातून नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट दरमहा 40 लाखांचे भाडे मिळत आहेत.
नेक्सस सिलेक्ट ट्रस्टला 31 डिसेंबर 2022 अखेर 257 कोटींचा नफा झाला आहे. कंपनीचा एकूण महसूल 1463 कोटी इतका आहे. यातून मॉल्समधून मिळणारे भाडे 1259 कोटी इतके असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी आरईआयटीच्या माध्यमातून माइंडस्पेस, एंबेसी आणि ब्रुकफिल्ड या तीन आरईआयटी कंपन्यांनी शेअर मार्केटमधून निधी उभारला होता. या कंपन्यांनी सुरुवातीला गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता.