मुंबईतील स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी ऑगस्ट महिना जबरदस्त ठरला आहे. या महिन्यात मालमत्ता खरेदी आणि नोंदणीमध्ये वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात मुंबईत 10 हजार 515 मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीत 22% वाढ झाली. मालमत्ता नोंदणीतून राज्य सरकारला ऑगस्ट महिन्यात 783 कोटींचे मुद्रांक शुल्क मिळाले.
नोंदणी आणि स्टॅंम्प महानिरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात सरकारला 783 कोटींचा कर महसूल मिळाला. मागील 10 वर्षांतला हा कोणत्याही एका महिन्यात मिळालेला सर्वाधिक कर महसूल आहे. यापूर्वी ऑगस्ट 2012 मध्ये सरकारला मालमत्ता नोंदणीतून सर्वाधिक महसूल मिळाला होता.
ऑगस्टमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातून 10 हजार 515 प्रॉपर्टींची नोंदणी झाली. ऑगस्ट 2022 च्या तुलनेत यात 22% वाढ झाली. जुलै 2023 च्या तुलनेत प्रॉपर्टी नोंदणीत 2% वाढ झाली.
मुंबईत स्थावर मालमत्तांचे भाव गगनाला भिडले आहेत. बँकांनी गृह कर्जाचे दर वाढवले आहेत. मात्र तरिही मुंबईत घरांची मागणी कायम आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात घर खरेदीचा ओघ सुरुच होता.
पश्चिम उपनगरातील 75% ग्राहकांनी तर मध्य उपनगरातील 84% ग्राहकांनी तिथल्याच स्थानिक प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करण्याचे निर्णय घेतल्याचे दिसून आले. मुंबईतील नोकरदारांचे उत्पन्न वाढल्याने त्याचे सकारात्मक परिणाम स्थावर मालमत्ता क्षेत्रावर दिसून येत आहेत.
ऑगस्टमधील मालमत्ता नोंदणीत घरांचे प्रमाण जवळपास 80% आहे. यात मालमत्तेची सरासरी किंमत 1 कोटींच्या आसपास होती. 2020 मध्ये हे प्रमाण 48% तर 2023 मध्ये सरासरी 57% इतके होते.
नाईटफ्रॅंक इंडिया संस्थेच्या आकडेवारीनुसार वर्ष 2023 मधील आठ महिन्यात एकूण 83 हजार 263 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. यातून सरकारला 7 हजार 242 कोटींचा महसूल मिळाला.