शेअर बाजारात येत्या 12 नोव्हेंबर 2023 रोजी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर मार्केटमध्ये रविवार 12 नोव्हेंबर रोजी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 ते 7.15 या मुहूर्तावर गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंग करता येईल.
दरवर्षी शेअर मार्केटमध्ये हिंदु नववर्षानुसार (सवंत्सर) व्यवहार होतात. या वर्षाची सुरुवात मुहूर्ताच्या सौद्यांनी केली जाते. यंदा मुहूर्ताचे सौदे 12 नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी होणार आहेत. यासाठी खास ट्रेंडिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे. एरव्ही शनिवारी आणि रविवारी शेअर मार्केट बंद असते.
मागील 10 वर्षांची कामगिरी पाहिली तर 10 पैकी 7 वेळा मुहूर्ताच्या ट्रेडिंगवेळी शेअर निर्देशांकात वाढ झाली होती. मागील दोन वर्ष सेन्सेक्स आणि निफ्टीने मुहूर्ताला सकारात्मक सुरुवात केली होती. मुहूर्ताचे सौदे इक्विटी, कमॉडिटी, डेरिव्हेटिव्हज, करन्सी, फ्युचर्स, ऑप्शन अशा सर्वच प्रकारात होतील.
दरम्यान, जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे मागील आठवडाभरात शुक्रवार वगळता शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली. शुक्रवारी 27 ऑक्टोबर 2023 रोजी मात्र बाजार काही प्रमाणात सावरला. दिवसअखेर सेन्सेक्स 634 अंकांच्या वाढीसह 63782 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 190 अंकांच्या वाढीसह 19047 अंकांवर बंद झाला.