महागड्या स्मार्टफोन्सवर फायनान्स ऑप्शन असल्यामुळे आजकाल लाखो रुपयांचा स्मार्टफोन सहज खरेदी करता येतो.मात्र महाग स्मार्टफोन्सवर मोबाईल इन्शुरन्स घेण्याचा सल्ला विक्रेत्याकडून दिला जातो. मोबाईल इन्शुरन्समुळे मोबाईलचे काही नुकसान झाले तर ग्राहकाला त्याची भरपाई मिळते. मात्र प्रत्येक मोबाईल सोबत इन्शुरन्स मिळतोच किंवा बंधनकारक आहे, असे मानणे चुकीचे आहे. मोबाईल इन्शुरन्स स्वतंत्रपणे खरेदी करावा लागतो.
स्मार्टफोन्स खरेदी करताना त्यावर इन्शुरन्स घेऊ शकतो, हे बहुतांश ग्राहकांना माहित नसते. यापूर्वी केवळ अॅपल सारख्या प्रिमीयम मोबाईलवरच इन्शुरन्स मिळत होता, असा सर्वसामान्यांचा गैरसमज होता. मात्र मोबाईलच्या किंमतीनुसार त्यावर इन्शुरन्सचा पर्याय उपलब्ध आहे. मोबाईल इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टींवर नुकसान भरपाई मिळते, ते या लेखातून जाणून घेऊया.
Table of contents [Show]
चोरीपासून संरक्षण
मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. विशेषत:दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोबाईल चोरांचा धोका असतो. रेल्वेत, बसमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरांकडून मोबाईल लंपास केले जातात. अशावेळी मोबाईल इन्शुरन्स असल्यास ग्राहकाला त्याची पूर्ण भरपाई मिळते.त्यामुळे नोकरदार वर्गासाठी मोबाईल इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.
फोन फुटला तरी मिळेल कव्हरेज
मोबाईल फोन पडला किंवा त्याला काही नुकसान झाले तर त्याची भरपाई तुम्हाला इन्शुरन्समधून मिळतो. महागाईचा विचार केला तर मोबाईल पडला किंवा डिस्प्ले खराब झाला तर प्रचंड खर्च करावा लागतो. मोबाईल रिपेअरिंगचा खर्च देखील वाढला आहे. यामुळे मोबाईल इन्शुरन्स असल्यास त्यावर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.
पाण्याने मोबाईलचे नुकसान झाले
मोबाईल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुमच्या मोबाईलचे पाणी किंवा इतर द्रव्याने नुकसान झाले तर त्यावर नुकसान भरपाई दिली जाते. याशिवाय मॉइश्चर किंवा आर्द्रतेमुळे मोबाईल बिघडला किंवा त्याचे नुकसान झाले तर त्यावर देखील विमा भरपाई दिली जाते.
रिपेअरिंगसाठी मोठा खर्चा झाल्यास मिळेल भरपाई
स्मार्टफोन महाग होत असतानाच त्यासाठीचा रिपेअर करण्याचा खर्च देखील वाढत आहे. अॅपल, सॅमसंग, वनप्लस यासारख्या महागड्या फोन्सला रिपेअरिंगसाठी देखील मोठा खर्च येतो. अशा वेळी मोबाईल इन्शुरन्स कामी येतो.
फोन हरवला तरी मिळेल भरपाई
तुमचा स्मार्टफोन हरवला तरी त्याची पूर्ण रक्कम भरपाई म्हणून मिळणार नाही, मात्र तुम्हाला मोबाईल इन्शुरन्समुळे काहीअंशी भरपाई मिळू शकते. त्यामुळे मोबाईल इन्शुरन्स आवश्यक आहे.