Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Milk Price Hike: वर्षभरात दूधाचे दर 12% नी वाढले; भाववाढ होण्यामागील कारणे काय?

Milk Price Hike

मागील एक वर्षात दूधाच्या किंमती प्रति लीटर 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत प्रत्येक घरात दूधाचे सेवन होते. तसेच दूधापासून तयार केलेल्या पदार्थांनाही मोठी मागणी असते. दुधात सतत दरवाढ होत असल्याने दुग्धजन्य पदार्थांच्याही किंमती वाढल्या आहेत. दूध दरवाढ नियंत्रणात आणण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. नाहीतर पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतही दुधाचे दर हा मुद्दा गाजू शकतो.

Milk Price Hike: भारतामध्ये दुधाचे सेवन मोठ्या प्रमाणात होते. तसेच शेतीसोबत पशूपालन हा एक प्रमुख जोडधंदा देखील आहे. शेतकऱ्याच्या दारासमोर दुभती जनावरे हमखास दिसतात. भारतात शाकाहारी लोकांचेही प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांना मोठी मागणी असते. (Milk Price Increased) दूध उत्पादक सहकारी संस्थांचे जाळे भारतभर पसरलेले आहे. अमूल, गोकूळ, गोवर्धन सारखे दुधाचे ब्रँडही तयार झाले आहेत. मात्र, मागील काही वर्षात दुधाचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहेच. शिवाय दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे दरही वाढले आहेत.

2023 वर्ष सुरू झाल्यापासून गोकूळ, गोवर्धन, कात्रज, अमूलसह अनेक दूध उत्पादक संस्थांनी दरवाढ केली आहे. अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किंमती आवाक्यात ठेवण्यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे. मात्र, दुधाच्या किंमती काही आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाही. जर दुधाच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर जनतेचा रोष सरकारला विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांतही पाहायला मिळू शकतो.

वर्षभरात दुधाच्या किंमती 12% वाढल्या

मागील वर्षभरात भारतात दुधाच्या किंमती 12% वाढल्या आहेत. सरासरी एक लिटर दूध 57.15 रुपयांना मिळते. जनावरांचा चारा, आरोग्य, देखभाल खर्च वाढल्याने सहाजिकच त्याचा परिणाम दुधाच्या  किंमतींवरही झाला. चाऱ्याच्या दुर्भिक्ष्यामुळे दुधाचे उत्पादनही घटत आहे. कोरोनाकाळात जनावरांना पुरेसा चारा मिळाला नाही. तेव्हापासून जी दरवाढ सुरू झाली ती अद्यापही सुरूच आहे.

reasons-behind-milk-price-hike.jpg

अन्नपदार्थ महागाईत दूध आघाडीवर

भारतीयांच्या अन्नपदार्थांच्या बास्केटमध्ये दूधाला महत्त्व जास्त आहे. दुधाच्या किंमती वाढत असल्याने एकूणच महागाईचा दरही वाढत आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरवाढ केल्याने भाववाढीचा प्रमुख निर्देशांक 6 टक्क्यांच्या खाली आला. मात्र, दूध दरातील महागाई 9.31% राहिली. त्यामुळे मध्यमर्गीयांसाठी दूध खरेदी करणे महाग होऊन बसले आहे. केंद्रातील भाजप सरकारसाठी हा अलर्ट आहे. पुढील लोकसभा निवडणुकांच्या आधी किंमती नियंत्रणात आल्या नाही तर हा निवडणुकीतील एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल.

"दूध दरवाढीचा आलेख अडचणीचा ठरत आहे. दुधाच्या किंमती अत्यंत लवचिक असतात. त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होतो, असे डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष आर. एस. सोधी यांनी म्हटले. दुधाची मागणी पुरवठा याचा मेळ नाही. (dairy product price hike) त्यामुळे दूध उत्पादने निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वरती गेले आहेत. बड्या कंपन्यांना या परिस्थितीचा फायदा मिळत असल्याचेही बोलले जात आहे.

dudh-vardadh.jpg

दुभत्या जनावरांना जो खुराक दिला जातो, त्यात तृणधान्ये आणि तांदळाचा कोंडा याचा समावेश असतो. इतरही कृषी टाकाऊ मालाचा समावेश खुराकामध्ये असतो. या खुराकाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. किंमती वाढल्याने शेतकरीही दुभत्या जनावरांना पुरेसा खुराक देत नाही. त्यामुळे डेअरी उत्पादकांकडे दुधाचा पुरवठाही कमी होत आहे. हिवाळ्यात  12 ते 15 टक्क्यांनी दुधाच्या किंमती वाढल्या. अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांमुळेही जनावरांचा चारा महागला.

मान्सून अपुरा झाल्यास दरवाढीची शक्यता

यंदा एल-निलो या वातावरणीय घटकामुळे मान्सून अपुरा पडणार असल्याचे बोलले जात आहे. जर कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली तर चाऱ्याचे दुर्भिक्ष्य आणखी वाढू शकते. परिणामी चारा महाग होऊन दूध आणखी महाग होईल, सोबतच खुराकाचा खर्चही वाढेल. त्यामुळे येत्या काळात दुधाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. एखादी गाई कमी जरी दूध देत असली तरी तिला चारा मात्र, तेवढाच द्यावा लागतो. जनावरे पाळण्याचा खर्च वाढत असल्याने अनेक शेतकरी दुभती जनावरे विकूनही टाकत आहेत.