Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta Verified Paid Subscription: जाहिरातीतून पैसा मिळत असूनही फेसबुक आपल्याकडून पैसा का घेतंय?

Meta Verified Paid Subscription

Meta Verified Paid Subscription: ट्विटरच्या पाठोपाठ आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. खरंतर या सोशल मीडिया माध्यमांची कमाई जाहिरातीतून होत असते. तरीही ब्लू टिक सेवेसाठी पैसे का मोजावे लागणार आहेत?

सोशल मीडियावर विविध अ‍ॅपची गर्दी असली तरीही सगळ्यात लोकप्रिय अ‍ॅपमध्ये नाव घेतलं जातं ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं. या अ‍ॅपचे वापरकर्तेही लाखोंच्या संख्येत आहेत. पण, काही महिन्यांपूर्वी ट्विटरची मालकी अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याकडे गेली. आणि त्यांनी पहिला बदल केला तो ब्लू टिक साठी पैसे आकारण्याचा.

आता ट्विटर पाठोपाठ फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ‘मेटा व्हेरिफाईड’ ही सेवा आणली आहे. अर्थातच या सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राम चालवणारी मेटा ही कंपनी मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीची आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्येच मेटा व्हेरिफाईड विषयी माहिती दिली आहे.  

facebook-1.jpg
Facebook

यात झुकरबर्ग म्हणतात, ‘या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड सेवा सुरू करणार आहोत. ही सदस्यता सेवा असून तुम्हाला सरकारी ओळखपत्राद्वारे ‘ब्लू टिक (Blue Tick)’ मिळणार आहे. या अंतर्गत तुमच्या खात्याची पडताळणी करून त्याला अतिरिक्त संरक्षण मिळणार आहे. ही नवीन सेवा सत्यता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी लागू करण्यात येत आहे.’

अलीकडेच काही दिवसांपूर्वी मेटाने आपल्या फेसबुक वापरकर्त्यांना (Facebook Users) डेटा चोरीचा इशारा दिला होता. Meta ने अहवाल दिला होता की, Android आणि iOS वरील अनेक अ‍ॅप्सने त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल (Login Credentials) चोरली असून त्यांचा गैरवापर केला आहे. यातून जवळपास 10 लाख फेसबुक युजर्सचे लॉगिन क्रेडेन्शियल चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आता मेटाकडून व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा लागू करण्यात येणार आहे.

फेसबुक ब्लू टिकसाठी किती पैसे द्यावे लागतील?

मेटा व्हेरिफाईड सेवेची घोषणा करताना झुकरबर्गने युजर्सना किती रक्कम खर्च करावी लागेल, हे देखील सांगितले आहे. झुकरबर्गच्या म्हणण्यानुसार, वापरकर्त्याला वेबसाठी दरमहा $11.99 म्हणजेच सुमारे 1000 रुपये आणि iOS वापरकर्त्यांसाठी $14.99 म्हणजेच 1,200 रुपयापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या आठवड्यात ही सेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरु करण्यात येणार असून भारतात ही सेवा कधी पासून लागू होईल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन का आणलं?

तुमची फेसबुक आणि इन्स्टावरची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त पैसे भरा असं एक प्रकारे झुकरबर्ग यांचं म्हणणं आहे. पण, केवळ सुरक्षेसाठी लोक पैसे द्यायला तयार होतील का? मेटाने पैसे आकारण्याचा निर्णय का घेतला असावा हे जाणून घेण्यासाठी महामनीने माहिती तंत्रज्ञ आणि लेखक अतुल कहाते यांच्याशी संपर्क केला.

त्यांनी मेटाच्या व्हेरिफाईड अकाऊंटची तुलना ट्विटरच्या ब्लू टिकशी केली. ते म्हणतात,’ट्विटरने (Twitter) काही महिन्यांपूर्वी ही सुविधा आणली. याच पार्श्वभूमीवर मेटाने हा निर्णय घेतला आहे. मुळात हे एक प्रकारचे अनुकरण असून या निर्णयामागे मोठा विचार देखील करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला आर्थिक मंदीमुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरकपात करण्यात आली आहे. व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा पुरवल्यामुळे व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होतील आणि व्यवसायाची वृद्धी व्हायला मदत होईल.’

अतुल कहाते यांनी आपला मुद्दा आणखी समजून सांगण्यासाठी दोन उदाहरणं दिली.

  • टेक कंपन्यांमधली मंदी - एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर वारंवार आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं होतं. एकदा तर ट्विटरकडे फक्त 1 अब्ज अमेरिकन डॉलर इतकीच रोख रक्कम असल्याचं म्हटलं होतं. तसंच इतर टेक कंपन्यांचंही झालंय. झुकरबर्ग यांनी मागच्या दोन वर्षांत मेटाव्हर्स या प्रगत तंत्रज्ञानामध्ये पैसे गुंतवले आहेत. हे भविष्यातलं तंत्रज्ञान मानलं जात असलं तरी या घडीला कंपनीचे खूप सारे पैसे यात गुंतून पडले आहेत. त्यामुळे आर्थिक तंगी जाणवून कंपनीला नोकर कपातही करावी लागली आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाऊंटच्या माध्यमातून मेटा कंपनी महसूल मिळवू पाहात असल्याचं कहाते यांना वाटतं. 
  • अतिरिक्त सुरक्षा - व्हेरिफाईड अकाऊंटसाठी वापरकर्त्याला सरकारी आयडी वापरून आपलं अकाऊंट सत्यापित (Verify) करून घ्यायचं आहे. त्यामुळे अकाऊंट खरं आहे हे सर्वानाच कळेल. आणि दुसरं म्हणजे त्या बदल्यात फेसबुक तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा देणार आहे. त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षेची हमी असेल. त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचं बनावट खातं उघडून फसवणूक टाळता येईल.

व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवेचे इतर फायदे

याशिवाय अतुल कहाते यांना अशा अकाऊंटचे इतरही फायदे दिसतात. ‘मूळात व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा जर आपल्याकडे असेल, तर चार चौघातील त्या व्यक्तीचे स्थान, महत्त्व थोडं वेगळं असल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही नीट पाहिलंत तर लक्षात येईल की, अनेक राजकीय नेते, कलाकार मंडळी यांच्याकडे अशी ब्लु टिक असल्याने त्यांच्यावरची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते,’ असे कहाते यांनी सांगितले. 
‘सध्याच्या परिस्थितीत मेटा ही अतिशय मोठी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, जिच्याकडे सर्वाधिक युजर आणि आर्थिक पाठबळ सुद्धा आहे. याचाच फायदा मार्क झुकरबर्ग करून घेत आहेत,’ असेही कहाते यांनी महामनीशी बोलताना सांगितले.

लोक काय म्हणतायेत?

अनेक दिवसांपासून मेटाच्या या नवीन सेवेची चर्चा सगळीकडेच ऐकायला मिळत होती, मात्र, आतापर्यंत Meta ने या सेवेबद्दल सविस्तर माहिती दिलेली नव्हती. TechDroider ने असा दावा केला आहे, की मेटा व्हेरिफाईड सेवा ही केवळ प्रोफाईलसाठी उपलब्ध असेल, पेजेस साठी नाही. यावर अजूनपर्यंत मेटाकडून ठोस आणि अधिकृत माहिती सांगण्यात आलेली नाही.

सोशल मिडीयावर लोकांकडून यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. पैसे देऊन सेवा देण्याच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शवून निर्णयाची खिल्ली देखील उडवली आहे. त्यामुळेच सोशल मिडीयावर मिम्सला उधाण आलेले पाहायला मिळत आहे. भारतात ही सेवा येत्या सहा महिन्यात सुरु होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.