मुंबई शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांबरोबरच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांना देखील प्रचंड फायदा झाला आहे. आज बुधवारी 15 जून 2023 रोजी मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 291.89 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. बीएसईवरील कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलाने आज रेकॉर्ड स्तर गाठला.
चालू वर्षात बीएसईवरील कंपन्यांच्या बाजार भांडवलात सरासरी 4% वाढ झाली आहे. यापूर्वी डिसेंबल 2022 मध्ये बीएसईमधील कंपन्यांचे बाजार भांडवल 291.30 लाख कोटींवर गेले होते. त्यावेळी सेन्सेक्सने 63191.86 अंकांचा विक्रमी टप्पा ओलांडला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18812.50 अंकांवर गेला होता.
सेन्सेक्स आणि निफ्टीची रेकॉर्ड पातळीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी आजवरच्या उच्चांकी पातळीपासून केवळ 0.6% आणि 0.4% दूर आहेत. 28 मार्च 2023 नंतर दोन्ही निर्देशांकात सरासरी 10% वाढ झाली आहे.
आज दुपारी 12 वाजता मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 63100 अंकांवर ट्रेड करत आहे. त्यात 128.44 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 22.65 अंकांच्या घसरणीसह 18733.80 अंकांवर ट्रेड करत आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. महागाईचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्यात आले होते.अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हनेही पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवले आहेत. अर्थव्यवस्था महागाईतून सावरत असल्याने शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
ब्रोकर्सचा भारतीय शेअर इंडेक्सवर भरवसा कायम
शेअर निर्देशांकांच्य दमदार कामगिरीने अनेक ब्रोकर्स कंपन्यांनी बाजाराबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केले आहेत. गोल्डमनने मार्च 2024 अखेर निफ्टी 20000 पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीने डिसेंबर 2022 अखेर सेन्सेक्स 68500 अंकांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज वर्तवला आहे.
डिमॅट खात्यांनी केला नवा रेकॉर्ड
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनुसार मे महिनाअखेर एकूण डिमॅट खात्यांची संख्या 11 कोटी 81 लाख 50 हजार इतकी वाढली आहे. एप्रिल 2023 च्या तुलनेत नवीन डिमॅट खात्यांमध्ये 32% वाढ झाली. ऑगस्ट 2022 नंतर एकाच महिन्यात इतक्या सर्वाधिक डिमॅट खाती सुरु करण्यात आली आहे. नवीन डिमॅट खात्यांचा मागील 9 महिन्याती उच्चांक आहे.